ठाणे : सर्वसामान्य ठाणेकरांसाठी आरक्षित असलेल्या मैदानाच्या भूखंडाचा वसंत लॉन्स गृहसंकुलाजवळील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलने खासगी वापर केला आहे, असा आरोप मनसेने पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या परिसरात मैदान नसल्याने लहान मुलांना रस्त्यावर खेळावे लागते. तसेच नागरिकांना जॉगिंगसाठी उपवन तलावाचा रस्ता धरावा लागतो. एकीकडे बच्चे कंपनीच्या ऑनलाइन खेळावरून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच परिसरातील मैदानावर खासगी शाळांचा ‘खेळ’ सुरू असेल, तर मनसेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार, वसंत लॉन्सजवळील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलशेजारी ६६०० चौ.मी. (१.६१ एकर) क्षेत्रफळाचे खेळाचे मैदान नियोजित आहे. या मैदानाला शाळेने संरक्षित भिंत उभारून ते बंदिस्त केले आहे. दुसरीकडे गांधीनगर, सुभाषनगर, माजिवडा गाव, साईनाथ नगर, चिरागनगर, हरदासनगर या मध्यमवर्गीय लोकवस्तीमधील मुलांना त्यांच्या हक्काचे खेळाचे मैदान खुले नसल्याने रस्त्यावरच खेळाचा ‘डाव’ मांडावा लागतो. पालिकेच्या शहर विकास विभागामार्फत याबाबत स्पष्ट निर्देश असताना देखील शाळा मैदानाचा वापर स्वत:करिता करीत आहे. येत्या आठ दिवसांत मैदान सर्वसामान्यांसाठी खुले न झाल्यास मनसे स्टाइल आंदोलनाचा दणका दिला जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे. याबाबत पाचंगे यांनी ठाणे महापालिका आयुक्त, महापौर, शिक्षण समिती सभापती आणि न्यू होरायझन स्कॉलर्स शाळेच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला असून, मैदान स्थानिकांच्या हक्काचे आहे ते तत्काळ खुले करावे, अशी मागणी त्यांनी केली.
आरक्षित असलेला मैदानाचा भूखंड न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलच्या मालिकीचा असून, तो त्यांच्या ताब्यात आहे आणि तो मैदानासाठीच आरक्षित आहे. अद्याप महापालिकेकडे ते मैदान हस्तांतरित करण्यात आलेले नाही. परंतु, हस्तांतरित करण्याची पुढील कार्यवाही लवकरच केली जाईल. - राम जाधव, उपअभियंता, ठामपा