ठाणे : राज्याच्या पोलीस खात्यातील भ्रष्ट कारभाराप्रमाणे महापालिकांमध्ये चालणारा भ्रष्ट कारभार उघडकीस आलाच पाहिजे. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारीपदावर असलेल्या डॉ. राजू मुरूडकर यांनी व्हेटिंलेटर पुरविणाऱ्या ठेकेदाराकडून १५ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी पाच लाख रुपये घेताना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे ठाणेकरांचा महापालिका कारभारावरील विश्वास उडाला आहे. मुरुडकरचा बोलविता धनी कोण, त्याच्या मागे आणखी किती जण आहेत, या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी मनसे आणि भाजपने केली आहे. तसेच त्याच्या सहकाऱ्यांची नावे सोमवारी जाहीर करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.कोरोनाच्या काळात अशा पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्याला सेवेतून बाहेर काढा, अशी मागणी मनसेने केली आहे. त्यातही ते कोणाच्या सांगण्यावरून लाच मागत होते. त्यांना असे कृत्य करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी अथवा सत्ताधारी बडे राजकीय नेते यापैकी कोण सांगत होते. याची माहिती ठाणेकरांसमोर आलीच पाहिजे, अशी मागणी मनसेचे विद्यार्थी सेनेचे नेते संदीप पांचगे यांनी केली आहे.कोरोनाकाळात मुंबई, नवी मुंबई येथील ज्या रुग्णालयांनी अवाजवी बिले आकारली होती त्यांनी रुग्णांच्या खात्यात ती रक्कम जमा केली. परंतु, ठाणे महापालिका क्षेत्रात डॉ. मुरुडकर यांनी रुग्णालयांना पाठिशी घातले आहे. यामुळे कित्येक रुग्णांना परतावा मिळालेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कोरोना काळात डॉ. मुरुडकर याने प्रस्तावित केलेल्या निविदा तसेच केलेली खरेदी या सर्वांची चौकशी झाली आणि सत्य ठाणेकरांसमोर आले पाहिजे, अशी मागणी मनसेचे नेते महेश कदम यांनी केली आहे.मुरुडकरसमवेत असलेल्या अधिकाऱ्यांची, सहकाऱ्यांचीदेखील चौकशी करून नावे जाहीर करा अन्यथा मनसे ती नावे सोमवारी जाहीर करेल, असा इशाराही त्यांनी महापालिका आणि सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
लाचखोर मुरुडकरच्या सहकाऱ्यांची नावे मनसे सोमवारी जाहीर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 12:28 AM