ठाणे: मनसेप्रमुख राज ठाकरेंनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनविरोधात भूमिका घेतल्यावर आता मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शीळफाटा परिसरात बुलेट ट्रेनसाठी सुरू असलेली जागेची मोजणी मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडली आहे. जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोजणीची मशीन फेकून दिली. पोलिसांचा बंदोबस्त झुगारुन हे आंदोलन करण्यात आलं.
शीळफाटा परिसरातून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेकदा त्यांच्या भाषणांमधून बुलेट ट्रेनला विरोध केला आहे. बुलेट ट्रेनचा एकही रुळ टाकू देणार नाही, अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. त्यामुळेच बुलेट ट्रेनविरोधात आज मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शीळफाटा भागात शासनाकडून बुलेट ट्रेनच्या जागेसाठी मोजणी सुरू होती. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली 100 ते 150 कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पोलिसांचा बंदोबस्त झुगारुन या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. बुलेट ट्रेनसाठी सुरू असलेली जमीन मोजणी बंद करा, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी मनसैनिकांकडून प्रशासनाला देण्यात आला.