अंबरनाथ - अंबरनाथमधील एएसबी कंपनीत तीन मराठी कामगारांना नोकरीवरून काढल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना मंगळवारी चोप दिला. मनसेचा लढा हा कंपनी व्यवस्थापन आणि अधिकाºयांच्या विरोधात असताना निष्पाप कामगारांना मारहाण केल्याने रोष व्यक्त होत आहे.एएसबी कंपनीत गेल्या आठवड्यात तीन मराठी कामगारांना कामावरून काढण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात कंपनीत जाऊन याबाबत चर्चादेखील केली होती. या चर्चेनंतर कंपनी व्यवस्थापनाला तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. मंगळवारी पोलीस ठाण्यातही यासंदर्भात चर्चा झाली. मात्र कंपनी व्यवस्थापन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करून कंपनीला धडा शिकवण्याचा इशारा मनसे नेत्यांनी दिला. त्यानंतर कंपनीचा राग मनसेने तेथील परप्रांतीय कामगारांवर काढला. मनसेच्या या गुंडशाहीवर कामगारांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.
परप्रांतीय कामगारांना मनसैनिकांचा चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 4:25 AM