ठाणे - दोन अज्ञात इसमांनी चंदनवाडी भागात पुठ्याच्या बॉक्स मध्ये लपवून २ नवजात मोर विक्रीसाठी आणले होते. संशयास्पद वाटत असलेल्या या दोन इसमांना थांबवून बॉक्स मध्ये काय आहे अशी विचारणा महेश कदम यांनी केली असता त्या इसमांनी उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. यात काही गौडबंगाल आहे असा संशय आल्याने महेश कदम यांनी त्यांना पोलीस स्टेशनला चला आणि त्यांना सांगा काय ते असे म्हटल्यावर ते दोन इसम तो बॉक्स खाली टाकून पळून गेले.
त्या बॉक्स मध्ये पाहिल्यावर त्यात २ नवजात मोर आहेत असे आढळले.. हे २ मोर विक्रीसाठी आणण्यात आले असावेत असा संशय महेश कदम यांनी व व्यक्त केला. या दोन्ही मोरांना महेश कदम यांनी वन विभागाच्या ताब्यात दिले आहे. त्यातील एकाच्या पायाला जखम झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या सोबत येऊर मधील स्थानिक नागरिक कृष्णा हिंदोळे हे देखील उपस्थित होते.कदम यांनी आमच्या ताब्यात ते दोन नवजात मोर दिले आहेत. ज्यांच्या तावडीत हे दोन नवजात मोर होते त्या अज्ञात इसमांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे. उद्या कदम यांना बोलावून त्यांचे स्टेटमेंट घेऊन पुढील तपास केला जाईल.-नरेंद्र मुठे,वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र, ठाणे