ठाणे : टोलदरवाढी विरोधात मनसेने पुकारलेल्या उषोणानंतर चारचाकी वाहनांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच टोल नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद नगर टोलनाक्यावर जनजागृती केली. यावेळी येणाऱ्या प्रत्येक तीन, चारचाकी वाहनांना उपमुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ दाखवून टोल भरु नका असे आवाहन केले जात होते. परंतु याचवेळेस पोलिसांनी जनजागृती करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. आमची चूक काय असा सवाल करीत मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पोलिसांच्या या भुमिकेला विरोधसुध्दा केला. मात्र तरीसुध्दा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
मागील काही दिवसापासून ठाण्यासह राज्यात टोलदरवाढीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. सुरवातीला टोलनाक्यावर आंदोलन त्यानंतर शहरातील चौकाचौकात आंदोलन, नंतर गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन आणि चार दिवसांचे उपोषण अशा गांधीगिरी मार्गाने मनसेने ठाण्यात टोलदरवाढीविरोधात आंदोलन उभे केले. रविवारी राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि हे आंदोलन मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर मुंबईत सोमवारी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना टोलनमुक्ती द्या अन्यथा टोल नाके जाळू असा इशारा दिला आहे. तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार चाकी वाहनांना केव्हांच टोल माफी झाल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत नाही तोच, मनसेच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी आनंद नगर टोलनाका गाठला.
यावेळी अविनाश जाधव यांच्यासह शहर अध्यक्ष रवि मोरे, उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी येथून जाणाऱ्या वाहन चांलकांना उपमुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ दाखवून चारचाकी वाहनांना टोलमाफी झाली असल्याने टोल भरू नका अशी विनंती करण्यास सुरुवात केली. परंतु त्याला नवघर पोलिसांनी अटकाव केला. परंतु आम्ही कोणतेही आंदोलन करीत नसून केवळ जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत आम्ही अटक होणार नसल्याची भुमिका जाधव यांनी घेतली. परंतु तरीदेखील पोलिसांनी त्यांना अटकाव केला. उपमुख्यमंत्र्यांनी सांगूनही टोलनाक्यावर पैसे घेतले जात आहेत, त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. टोल घेतला जाऊ नये असे असतांना जबरदस्तीने टोलवसुली केली जात असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु तरीदेखील पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.