डोंबिवली : शहरातील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात साचलेला कचरा आणि घाणीच्या साम्राज्याकडे लक्ष वेधूनही केडीएमसी त्याकडे कानाडोळा करत आहे. मनविसेने सोमवारी त्याच्या निषेधार्थ केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात मैदानी खेळ खेळून अनोखे आंदोलन छेडले.डोंबिवलीतील खेळाडूंसाठी क्रीडासंकुल हे एकमेव मोठे मैदान आहे. खेळांडूंबरोबरच या मैदानात सकाळ व सायंकाळी मोठ्या प्रमाणावर नागरिक, ज्येष्ठ नागरिक चालण्या-फिरण्यासाठी येतात. परंतु, हे मैदान उत्सव आणि लग्न सोहळ््यांसाठी भाड्याने दिले जाते. त्यामुळे खेळाडू आणि नागरिकांवर बंधने येत आहेत.क्रीडासंकुलातील मैदानात १९ फेब्रुवारीला झालेल्या लग्न सोहळ््यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. तो उचलला न गेल्याने दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे मनविसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे यांनी केडीएमसीचे लक्ष वेधले होते. त्या वेळी कचरा २४ तासांत न उचलल्यास महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त पी. वेलरासू यांना तो पाठवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा शनिवारी झालेल्या अन्य एका सोहळ््यामुळे कचरा जमा झाल्याचे जेधे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात अनोखे आंदोलन छेडले.क्रीडासंकुलातील कचरा उचलण्याबाबत २० फेब्रुवारीला महापालिकेचे उपायुक्त सुरेश पवार यांना निवेदन दिले होते. त्यानंतरही २५ तारखेला पुन्हा कचरा आढळल्याचे जेधे म्हणाले. कचºयाच्या ढिगाची छायाचित्रे ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अमित पंडित यांना सादर करण्यात आली. त्या वेळी त्यांनी तत्काळ दखल घेण्याचे आश्वासन दिले. क्रीडासंकुल शनिवार आणि रविवारी खेळाडूंसाठीच राखीव असावे, अशीही मागणी या वेळी मनविसेने केली.दरम्यान, या आंदोलनात शहर सचिव प्रितेश पाटील, अमित बगाटे, सचिन कस्तुर, सुहास काळे, कौस्तुभ फडके, गणेश नवले, अनिश निकम, स्वप्निल वाणी, क्षितिज माळवदकर, चिन्मय वारंगे, नंदादीप कांबळे, योगेश चौधरी, जयेश सकपाळ, ज्ञानेश महाडिक आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मनविसेचे आंदोलन : केडीएमसी कार्यालयात खेळ खेळून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:59 AM