- सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील कायदा व व्यवस्था पुन्हा ऐरणीवर आला असून हनुमाननगर परिसरात बुधवारी मध्यरात्री १५ पेक्षा जास्त जणांच्या टोळक्याने हातात तलवारी घेऊन धिंगाणा घातला. त्यांनी १० पेक्षा जास्त घराची तोडफोड केली असून अनेक घरातून चोरी केली. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही.
उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील हनुमाननगर मध्ये बुधवारी मध्यरात्री दिड ते २ वाजण्याच्या दरम्यान १५ पेक्षा जास्त जणांच्या टोळक्याने हातात तलवारी फिरवीत धिंगाणा घातला. १० पेक्षा जास्त घराचे नुकसान केले असून अनेक घरातून मौल्यवान वस्तूची चोरी केल्याचे बोलले जात आहे. टोळक्यांचा धिंगाणा सुरू असताना पेट्रोलींग करणारे पोलीस आले. मात्र त्यांनी चॉकशी न करता तेथून पळ काढल्याची टीका स्थानिक नागरिक करीत आहेत. टोळक्यांचा दहशतीचे कोणताही नागरिक तक्रार करण्यास पुढे आला नाही. टोळक्यांच्या धिंगाण्याची सीसीटीव्ही कॅमेरे फूटेज व्हायरल झाल्यावर पोलिसांची एकच धावपळ उडाली. अखेर पोलिसांनी धिंगाणा घालणाऱ्याचा शोध सुरू केला असून काही जणांना ताब्यात घेतल्याचे बोलले जाते.
शहरातील हनुमाननगर परिसरात धिंगाणा घालणाऱ्या टोळीतील काही जणांनी झा नावाच्या तरुणाला बुधवारी एका कंपनीत जाऊन मारहाण केली. गंभीर जखमी असलेल्या तरुणावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची चर्चाही परिसरात आहे. पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही. याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त टी बी टेळे यांनी दिली. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही. तलवारी घेऊन मध्यरात्री धिंगाणा घालणाऱ्या १५ पेक्षा जास्त जणांच्या टोळीवर सक्त कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरारून होत आहे.