बदलापूर : बदलापूर पालिकेने रिलायन्स जिओ कंपनीला रस्ते खोदण्याकरिता दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त रस्ते कंपनीकडून खोदण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. रस्ते खोदल्यानंतर ते पूर्ववत करण्याकरिता भरावयाच्या रकमेपैकी निम्मे पैसे कंपनीने पालिकेकडे भरले आहेत. वेगवेगळ््या विभागांमधील नगरसेवकांनी कंपनीच्या मनमानी रस्ते खोदण्याबाबत पालिकेकडे तक्रार केली असून संबंधित मोबाइल कंपनीकडून रस्ते पूर्ववत करण्याचे पूर्ण पैसे भरुन घेण्याची मागणी केली आहे.
बदलापूर पालिकेच्या हद्दीत सध्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड या कंपनीमार्फत केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्याचे काम सुरु आहे. या कंपनीला रस्ते खोदल्यानंतर पूर्ववत करण्यासाठी परवानगी देताना प्रति रनिंग मीटर प्रमाणे ५५०० रु पये भरावे लागतील, असा दर निर्धारित करण्यात आला. कंपनीला दिलेल्या परवानगीनुसार १२ हजार ८६८ मीटर एवढा रस्ता खोदण्यासाठी त्यांना ७ कोटी १३ लाख २४ हजार इतक्या रकमेचा भरणा पालिका कार्यालयात करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी ३ कोटी ७६ लाख इतक्याच रकमेचा भरणा केला आहे. तसेच उर्वरित रकमेची बँक गॅरंटी दिली आहे. त्यामुळे या रकमेच्या व्याजाला पालिकेला मुकावे लागणार आहे.
खोदकामासाठी परवानगी देताना प्रत्यक्ष जागेवर मोजमाप न घेता परवानगी देण्यात आली आहे. परवानगी देताना एखाद्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंतचे दाखवण्यात आलेले अंतर व प्रत्यक्षातील अंतर यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत आहे. त्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रु पयांचे नुकसान होणार असल्याचे संभाजी शिंदे यांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर अंतर निश्चित करतांनाही मोठा घोळ घालण्यात आला आहे. खोदकामाकरिता दिलेल्या परवानगी पत्रात सोनीवली गाव ते उल्हासनदी पूल हे अंतर ६६ मीटर तर उल्हासनदी पूल ते भगवती हॉस्पिटल हे अंतर ५४ मीटर असे दाखवण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात सोनीवली गाव ते उल्हासनदी पूल हे अंतर सुमारे १ किमीहून अधिक असून उल्हासनदी पूल ते भगवती हॉस्पिटल हे अंतरही सुमारे ८०० मीटरहून अधिक आहे.
खोदकामास परवानगीसाठी किती रकमेचा भरणा करण्यात आला आहे, प्रत्यक्ष किती खोदकाम झाले आहे, याची शहानिशा केली जाईल. संभाजी शिंदे यांनी केलेल्या आरोपात तथ्य आढळल्यास पुढील खोदकाम थांबवून संबंधितांकडून पैसे वसूल केले जातील.- प्रकाश बोरसे ,मुख्याधिकारी, बदलापूर पालिका