अंबरनाथ : अंबरनाथ कोहोजगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा आयफोन चार्जिंगला लावताच स्फोट झाला. या स्फोटामुळे घरातील गादीला आग लागली. मोबाइलजवळ बसलेल्या तरुणाचा पायदेखील त्यामुळे भाजला. स्फोट झाल्यानंतर लागलेली आग या तरुणानेच पाणी टाकून विझवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या स्फोटानंतर अॅपल कंपनी, दुकानदार आणि पोलिसांकडेही तक्रार अर्ज करण्यात आला आहे.अंबरनाथमधील अमित भंडारी या कोहोजगावातील तरुणाने गेल्या वर्षी २६ हजार रुपयांचा आयफोन घेतला होता. मोबाइल घेऊन अवघे १४ महिनेच झाले होते. भंडारी यांच्याकडे या आधीदेखील याच कंपनीचा मोबाइल होता. मात्र तो नादुरुस्त झाल्याने त्यांनी पुन्हा नवा आयफोन विकत घेतला. रविवारी रात्री भंडारी हे लग्न समारंभ आटोपून उशिरा घरी आले. बॅटरी संपत आल्याने त्यांनी बेडवर बसून मोबाइल चार्जिंगला लावला. मोबाइल चार्जिंगला लावून १० मिनीटे होत नाही, तोच मोबाइलचा अचानक स्फोट झाला. भंडारी यांनी मोबाइल जवळच ठेवल्याने या स्फोटामुळे त्यांचा पाय भाजला. त्यांनी लगेच बेडवरुन उडी मारली; मात्र स्फोटामुळे बेडवरील गादी जळाली. जखमी अवस्थेत त्यांनी पाणी टाकून ही आग विझवली.या प्रकारानंतर नेमके काय करावे, याची कल्पना त्यांना नव्हती. नामांकित कंपनीच्या मोबाइलचा स्फोट होत असेल, तर त्याची कल्पना पोलिसांना देणे गरजेचे असल्याचे परिचितांनी सांगितल्यावर त्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. याशिवाय अमित यांनी संबंधित कंपनीकडेही तक्रार करण्याची तयारी केली आहे. या स्फोटामुळे भंडारी यांच्या पायाला दुखापत झाली असून, त्यांच्यावर सोमवारी रुग्णालयात उपचार करुन घरी सोडण्यात आले.
मोबाइलचा स्फोट, तरुण भाजला; पोलिसांकडे दिली घटनेची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:22 AM