ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आजही शहराच्या काही भागांत असल्याने, अशा भागांसाठी फिरती विसर्जन व्यवस्था करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी शुक्रवारी दिली. प्रत्येक प्रभाग समितीमध्ये ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी भाविकांनी घरीच श्रींची आरती करून मूर्ती फिरत्या विसर्जन केंद्राकडे द्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
कोरोनामुळे या वर्षीही ठाण्यात श्री विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिका विविध उपाययोजना करीत असून, त्यासाठी कृत्रिम तलावासोबतच मूर्ती स्वीकृती केंद्रेही तयार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, डीजी ठाणे प्रणालीद्वारेही गणेश विसर्जनासाठी ऑनलाइन बुकिंग योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी यंदाही फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या व्यवस्थेच्या माध्यमातून ट्रॅक्टर अथवा जीपच्या मागे सिंटेक्स टाकीच्या माध्यमातून कृत्रिम विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या ठिकाणी विसर्जनासाठी महापालिकेतर्फे स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, भाविकांना विसर्जनासाठीची आरती ही घरीच करावी लागणार असून, महापालिकेने तयार केलेल्या या फिरत्या विसर्जन व्यवस्थेंतर्गत श्री गणेशाचे कृत्रिम तलावामध्ये ज्याप्रमाणे विधिवत विसर्जन करण्यात येते. त्याच पद्धतीने श्रींचे विसर्जन करण्यात येणार आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये वाहनांद्वारे ही फिरती विसर्जन व्यवस्था तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.