लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, स्वर्गरथ, जनाजा यांचे मोबाईल नंबर गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अत्यावश्यक सेवेच्या मोबाईलची बिले भरली नसल्याने हा प्रकार झाला. वाहन व्यवस्थापक यशवंत सगळे यांनी सोमवारी अत्यावश्यक सेवेतील मोबाईल सुरू झाल्याची माहिती दिली.
उल्हासनगर महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी ३ रुग्णवाहिका, ४ स्वर्गरथ व २ जनाजा तैनात केले असून या अत्यावश्यक सुविधा त्वरित उपलब्ध होण्यासाठी व्हॅन व रुग्णवाहिकेचे मोबाईल नंबर जाहीर करण्यात आले आहेत. नागरिकांनी या मोबाईलवर संपर्क साधला की, काही मिनिटांत महापालिका सेवा उपलब्ध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवेतील मोबाईल नॉट रिचेबल असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेने अत्यावश्यक सेवेतील मोबाईल बिले भरली नसल्याने हा प्रकार झाल्याची माहिती उघड झाली. याबाबतची माहिती मनसेचे शहर संघटक मेनुद्दीन शेख यांना मिळाल्यावर त्यांनी संबंधितावर कारवाईची मागणी केली.
महापालिकेवर शिवसेना मित्रपक्षांची सत्ता असून पालिका अत्यावश्यक सुविधेचे मोबाईल सुरू ठेवत नसल्याने सर्वस्तरातून टीका होत आहे. दुसरीकडे शहर विकासासाठी कोट्यवधींचा निधी शासनाकडून आणल्याचे शिवसेना सांगत आहे. करोडोंचा विकास निधी आणल्याच्या फुशारक्या मारणाऱ्या शिवसेनेने रुग्णवाहिका, स्वर्गरथ व जनाजासाठी दिलेली अत्यावश्यक मोबाईल सेवा २४ तास सुरू ठेवावी असे सर्वस्तरातून बोलले जात आहे. असेच प्रकार सुरू राहिल्यास भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेने दिला.