सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३ छत्रपती शिवाजी महाराज चौकातील साऊंड ऑफ म्युझिक या मोबाईल दुकानातून शनिवारी रात्री १८ लाख ७२ हजाराचे मोबाईलची चोरी झाली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर, पोलिसांनी काही तासात आरोपीला मोबाईलसह गजाआड केले. त्याने यापूर्वीही अंबरनाथ मध्ये मोबाईल चोरल्याचे उघड झाले.
उल्हासनगर कॅम्प नं-३ छत्रपती शिवाजी महाराज चौकातील साऊंड ऑफ म्युझिक या मोबाईल दुकानात रविवारी चोरी झाल्याचे उघड झाले. दुकानदार राकेश गंभानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरेच्या मदतीने काही तासात चोरटा मोहम्मद फिरोज नहीम अहमद खान याला मोबाईलसह अटक केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील शिवाजी चौकात राकेश गंभानी यांचे साऊंड ऑफ म्युझिक नावाचे मोबाईल दुकान आहे. रविवारी सकाळी दुकान उघडल्यावर आत मध्ये सर्व सामान अस्तव्यस्त पडले होते. तसेच मोबाईल चोरी झाल्याचे उघड झाल्यावर गंभानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार झाली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरट्या पर्यंत पोहचले. चोरट्याचे नाव मोहम्मद फिरोज खान असे आहे. शनिवारी रात्री दुकानाच्या वरच्या मजल्यावर जाऊन दुकानाची कंपोस्टिंग तोडून प्रवेश केला. तसेच तब्बल १८ लाख ७२ हजाराचे मोबाईल चोरून पोबारा केला. मोबाईलची पिशवी उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या शौचालयात ठेवून रात्र स्टेशनवर काढली.
मध्यवर्ती पोलिसांनी मोबाईल चोरटा मोहम्मद खान याला बोलते केले असता, त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेला मोबाईल जप्त केले असून त्याने यापूर्वी अंबरनाथ येथील मोबाईल दुकानावर डल्ला मारला होता. तसेच त्याला दुबईला जाऊन मौज करायची होती. यापूर्वी तो तीन वेळा दुबईला जाऊन आला होता.