ठाणे : लोकल प्रवासात गेल्या वर्षभरात ठाणे स्थानकात पाकीट आणि मोबाइल चोरीच्या तब्बल ३०६६ घटना घडल्या आहेत. मात्र, २०१८ च्या तुलनेत या चोरीच्या घटनांना ब्रेक लागला असून २०१८ च्या तुलनेत या गुन्ह्यांची आकडेवारी २०१९ मध्ये एक हजार १५६ ने कमी झाल्याचा दावा ठाणे रेल्वे पोलीस सुरक्षा बलाने केला आहे. ठाणे आरपीएफ आणि जीआरपीची कारवाई आणि रेल्वेस्थानकांवर या दोन्ही पोलीस दलांच्या गस्तीमुळे चोरीच्या घटनांना आळा बसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.ठाणे रेल्वेस्थानकातून सात ते आठ लाख प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे पोलिसांमार्फत मोबाइल चोरीच्या घटनांचे एफआयआर नोंदवले जाऊ लागल्यामुळे ठाण्यात हे गुन्हे मोठ्याप्रमाणात वाढले. त्यातच मोबाइल आणि पाकीट चोरी अशा दोन्ही गुन्ह्याची संख्या २०१८ मध्ये चार हजार २२२ इतकी नोंदवली गेली होती. हे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ठाणे आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी मोबाइल आणि पाकिट चोरीच्या घटनांची सुसाट निघाली लोकल ट्रेन थांबण्यासाठी रेल्वेस्थानकावर गस्तीचे प्रमाण वाढवले. त्यामुळे स्थानकावर खाकी वर्दी दिसू लागली. तसेच फटका पॉन्ईटवर लक्ष केंद्रीत केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चोरट्यांची चोरीची पद्धत पाहून त्यांच्यावर पोलीस नजर ठेवले जाऊ लागले. तसेच सध्या वेषात पोलीस पथकाचा वावर वाढल्याने या चोरीच्या घटनांना आळा बसला. त्यामुळे २०१९ या वर्षभरात तीन हजार ६६ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. तर २०१८ या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण १ हजार १५६ ने कमी झाल्याची माहिती ठाणे आरपीएफ पोलिसांनी दिली. मोबाइल आणि पाकीट चोरीच्या घटनांची आकडेवारी निश्चित संख्या कमी झाली आहे. यामध्ये आरपीएफ पोलिसांबरोबर जीआरपी पोलिसांचेही तितकेच श्रेय आहे. हे प्रमाण या वर्षातही वाढणार नाही. याची दोन्ही पोलीस दलांकडून निश्चितच खबरदारी घेतली जाईल.- राजेंद्र पांडव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे आरपीएफ.
ठाणे स्थानकात पाकीटसह मोबाइलचोरीचे प्रमाण घटले, ११५६ घटना कमी झाल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 5:35 AM