कल्याण : मेल,एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांचा मोबाईल चोरणाऱ्या एका चोरट्याला प्रवाशांनी पकडून रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी जेरबंद केले. दोघांकडून ११ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. हसन ऊर्फ अरबाज शेख आणि तसलीम शेख (रा. मुंब्रा), अशी आरोपींची नावे आहेत. कल्याण रेल्वे न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल म्हणाले, शुक्रवारी पहाटे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मंगला एक्स्प्रेसमधून सगीर अहमद हे प्रवास करीत होते. त्यांचा महागडा मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. सगीर त्यांनी सहप्रवाशांसह बोगीत झाडाझडती सुरू केली. त्यावेळी त्यांनी एका संशयित तरुणाकडे तपासणी केली असता त्याच्याकडे सगीर यांचा मोबाईल सापडला. त्यामुळे त्यांनी आरोपी हसन याला पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. हसनला पोलिसीखाक्या दाखविताच त्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली. तर, त्याचा साथीदार तसलीम याला मुंब्रा येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून ११ मोबाईल हस्तगत केले. त्यापैकी चार मोबाईल चोरीस गेलेल्या प्रवाशांचा पत्ता पोलिसांना मिळाला आहे. तर, अन्य सात मोबाईल कुणाचे आहेत, याचा शोध सुरू आहे.
इगतपुरी-कल्याणदरम्यान चोरी
हसन हा मुंब्रा येथून ठाण्याला गेला. ठाण्याहून तो इगतपुरीला गेला होता. त्याने सगीर यांचा मोबाईल इगतपुरी ते कल्याण प्रवासादरम्यान चोरला होता, अशी माहिती त्याने पोलिसांनी दिली आहे.
--------------------