- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सोनसाखळीसह मोबाइल हिसकावून पळणाऱ्या अलीअक्तर ऊर्फ अली फयाज हुसैन जाफरी आणि हासिम जाफर हुसैन सय्यद ऊर्फ इराणी (रा. आंबिवली, कल्याण) दोन अट्टल चोरट्यांसह तीन मोबाइल चोरांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ लाख ९२ हजारांचे सोन्याचे दागिने आणि २८ मोबाइल हस्तगत केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली. भिवंडी, कल्याण आणि ठाणे परिसरातील महिलांचे मंगळसूत्र तसेच सोनासाखळी हिसकावण्याच्या प्रकारांबरोबर मोबाइल हिसकावण्याच्या प्रकारांमध्येही वाढ झाली होती. त्यादृष्टीने तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गुन्हे अन्वेषण विभागाला अलीकडेच दिले होते. भिवंडी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना आंबिवली परिसरातील अलीअक्तर आणि हासिम या दोन सोनसाखळी चोरट्यांची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने आंबिवलीच्या इराणी वस्तीतून दोघांना अटक केली. त्यांनी ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील १३ सोनसाखळी चोऱ्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे ४०० ग्रॅम वजनाचे ११ लाख २० हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.मोक्काही लागणारइराणी वस्तीतून जेरबंद केलेले हे सोनसाखळी चोरटे ‘टॉप २०’ अट्टल चोरट्यांमधील असून त्यांच्यावर याआधीच मोक्का लावण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर मोक्कांतर्गतही कारवाई होणार असल्याचे रानडे यांनी सांगितले.२८ मोबाईल चोरल्याची आरोपींची कबुलीठाणे, भिवंडी आणि कल्याण परिसरात पायी जाणाऱ्या तसेच रिक्षाने जाणाऱ्या नागरिकांकडून मोबाइल हिसकावणाऱ्या दीपक खरात, भावेश नांदुरकर आणि अमर सिंग या तिघांनाही भिवंडीतून राऊत यांच्या पथकाने अटक केली आहे. त्यांनी २८ मोबाइल चोऱ्यांची कबुली दिली आहे. त्यातील १० मोबाइल हे ठाणे शहर परिसरातून चोरण्यात आले असून उर्वरित १८ मोबाइल कोणत्या परिसरातून चोरले, याचाही तपास सुरू असल्याची माहिती रानडे यांनी दिली.