पंढरीनाथ कुंभार, भिवंडीपालिकेच्या भादवड येथील शाळेच्या इमारतीवरील मोबाइल टॉवर आणि अन्य यंत्रांच्या वजनाने इमारतीच्या तळ मजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंतच्या स्लॅबला तडे गेले आहेत. गॅलरी आणि खिडक्यांचे गज वाकवून संपूर्ण इमारतच धोकादायक बनली आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षण मंडळाच्या प्रशासनाने वारंवार पालिकेच्या बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने विद्यार्थी अक्षरश: जीव मुठीत घेऊन शिकत आहेत.भादवडच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन १९९० च्या सप्टेंबरमध्ये झाले. या तीन मजली इमारतीत तीन प्राथमिक आणि एक माध्यमिकअशा चार शाळा भरतात. प्राथमिकच्या सत्रात ८६८ आणि माध्यमिकच्या सत्रात २१३ विद्यार्थी आहेत. त्यांच्यासह शिक्षक आणि इतर कर्मचारीही आहेत. मात्र, इमारतीची क्षमता लक्षात न घेता आठ वर्षांपूर्वी बसवलेल्या बीएसएनएलच्या अवजड मोबाइल टॉवरमुळे इमारतीच्या तळातील खांब खचू लागले असून जिन्याला आणि स्लॅबला तडे गेले आहेत. पावसाळ्यात स्लॅब गळतात. इमारतीची क्षमता लक्षात न घेता टॉवर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. शिक्षकांसह पालकांनीही याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. पालिकेकडून इमारतीची देखभाल-दुरुस्ती न झाल्याने इमारतीची अवस्था बिकट झाली आहे. शहरातील नागरिकांना नेहमी स्ट्रक्चरल आॅडिटसाठी नोटिसा बजावणारा पालिकेचा बांधकाम विभाग स्वत:च्या इमारतीबाबत मात्र जागरूक नसल्याचे यावरून स्पष्ट झाले. या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट न करता किंवा अनधिकृत टॉवर न हलविता थातूरमातूर दुरुस्ती सध्या सुरू असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोबाइल टॉवरमुळे जातात शाळेच्या इमारतीला तडे
By admin | Published: February 05, 2016 2:40 AM