टिटवाळा : कल्याण-डोंबिवली महापालिकेने झोपडपट्टी विभागात माेबाइल व्हॅनद्वारे काेराेना लसीकरणाची माेहीम दोन महिन्यांपूर्वी सुरू केली होती. मात्र, या मोबाइल व्हॅनच्या कामात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे ही मोहीम तीन-चार दिवसांपासून प्रशासनाला बंद करावी लागली आहे. त्यामुळे पालिकेच्या १२२ प्रभागांत लसीकरणाचे केंद्र उभारण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दीड वर्षाच्या कालावधीत महापालिका प्रशासनाने मोजक्याच ठिकाणी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीकरण केंद्रे सुरू केली होती. मात्र, लसींचा पुरवठा कमी आणि लस घेणाऱ्यांचा आकडा दहापटीने जास्त असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. केंद्र शासनाकडून लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने उघडलेली केंद्रे आठवडाभरात बंद करावी लागत होती. लस मिळण्यासाठी सामान्यांना मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत लाइनमध्ये उभे राहण्याची वेळ, मांडा-टिटवाळा, मोहने, कल्याण, डोंबिवली येथील नागरिकांवर आली आहे. लसीकरणादरम्यान हाणामारीचे प्रकार घडल्याने अनेकदा केंद्रांवर बंदोबस्तासाठी पोलिसांनाही पाचारण करावे लागत होते, तर झाेपडपट्टी विभागातील केंद्रांवर नागरिक येत नसल्याचे उघड झाले.
पालिका प्रशासनाने उभारलेल्या केंद्रांवर झोपडपट्टी विभागातील नागरिक लसीकरणासाठी येत नसल्याची माहिती स्पष्ट झाली. त्यामुळे झोपडपट्टी विभागासाठी मोबाइल लसीकरण व्हॅन उपलब्ध केल्याने या ठिकाणी लस घेण्यासाठी गर्दी जमली. मात्र, गल्लीबोळातील स्वयंघोषित नेते, तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तिथेही अरेरावी सुरू केल्याने, ज्येष्ठ नागरिकांनाही लस मिळणे कठीण होऊ लागले. त्यातच संबंधित डॉक्टर, नर्स यांच्यावर स्थानिक कार्यकर्त्यांनी अरेरावीची भाषा सुरू केल्याने याबाबतची माहिती पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांना समजताच, चार दिवसांपासून लसीकरणाची ही व्हॅन बंद केल्याची माहिती एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली.