उल्हासनगर : महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व तयारी शिबिर उल्हास नदीकाठी बुधवारी रायता येथे सकाळी दहा वाजता आयोजित केले होते. यावेळी आयुक्त अजित शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे आदीजन उपस्थित होते.
उल्हासनगर महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने मॉकड्रील शिबीराचे आयोजन बुधवारी केले. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त सेवा करूणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवडे, सुभाष जाधव व आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा अग्निशमन प्रमुख बाळू नेटके व अग्निशमन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्भवल्यास कशा पद्धतीने बचाव करावा.
यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी व महापालिकेकडे उपलब्ध साधनसामग्री यांची पूर्व तपासणी करण्यासाठी व सरावासाठी आज सदरचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. अग्निशमन विभागाचे जवान पाण्यात अडकलेल्या नागरिकांना व बुडणाऱ्या व्यक्तीला कशा पद्धतीने वाचवता येईल याकरता सराव करत आहेत. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या बोटी, पंप सुरक्षा साधने यांची देखील तपासणी यादरम्यान करण्यात आली. महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग हा कोणत्याही प्रकारच्या येणाऱ्या आपत्तीसाठी सक्षम व सज्ज असल्याची माहिती अतिरिक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.