पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहरात मान्सून सुरू होण्यापूर्वी धोकादायक इमारतीमध्ये दुर्घटना घडल्यास तत्काळ करावयाच्या उपाययोजनांबाबत शनिवारी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने नौपाडा, महात्मा गांधी रोडवरील नंदिनी निवास या सी-१ रिक्त इमारतीमध्ये आयुक्तांच्या निर्देशानुसार ‘मॉकड्रिल’ घेण्यात आले.
यामध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये १० आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा, २ ॲम्ब्युलन्स, टीडीआरएफच १५ जवान, अग्निशमन विभागाचे ३० कर्मचारी तसेच महानगर गॅसचे कर्मचारी यांचा समावेश होता.
धोकादायक इमारतीमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास आरोग्य विभाग, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस यंत्रणा तसेच टीडीआरएफ या सर्वच यंत्रणांची तयारी कशी आहे, ते किती वेळात प्रतिसाद देतात. या प्रतिसादानंतर त्यांनी कशी तयारी केली आहे? आपल्या सर्व सामग्रीची ते किती चपळाईने हाताळणी करतात, हे सर्व पाहण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आदेश दिले हाेते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उपआयुक्त संदीप माळवी, अग्निशमन अधिकारी गिरीश झलके उपस्थित होते.