ठाणे : शहरातील घोडबंदर रोडवरील एका मॉलमध्ये तीन ते चार सशस्त्र अतिरेकी शिरल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या बिनतारी यंत्रणेद्वारे वागळे इस्टेट परिमंडळातील सर्व पोलीस ठाण्यांना सोमवारी सकाळी मिळाली. तासाभराच्या अंतराने शीघ्रकृती दलाने तिघा कथित अतिरेक्यांना ताब्यात घेतल्यानंतर हे मॉकड्रिल (रंगीत तालीम)असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांसह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.घोडबंदर रोडवरील ‘डी मार्ट’ या मॉलमध्ये तिघे संशयित शिरले असून ते सशस्त्र अतिरेकी असल्याची शक्यता असल्याची माहिती बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे कासारवडवली, चितळसर आणि कापूरबावडी या तीन पोलीस ठाण्यांना मिळाली. ती मिळताच कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या पथकाने अवघ्या काही मिनिटांमध्ये घटनास्थळी धाव घेतली. त्यांपाठोपाठ बॉम्ब शोधक नाशक पथक, शीघ्रकृती दल, परिमंडळ पाचचे राखीव फोर्स यांनीही या मॉलचा ताबा घेतला. काही वेळातच मॉलचे सर्व प्रवेशद्वार वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली बंद करण्यात आले. बीडीडीएस आणि शीघ्रकृती दलाने १५ ते २० मिनिटे राबविलेल्या सर्चिंग आॅपरेशन नंतर तिघा कथित अतिरेक्यांना शस्त्रांस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले. अशीच एखादी घटना घडली किंवा अतिरेकी एखाद्या मॉलमध्ये आलेच तर पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका अशा सर्वच यंत्रणा किती वेळात दाखल होतात, याची चाचपणी घेण्यासाठी हे मॉकड्रिल राबविल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी ‘लोकमत’ ला दिली. सर्वच यंत्रणांनी यावेळी तत्परता दाखविल्याचे ते म्हणाले. हे केवळ मॉकड्रिल असल्याची माहिती मॉलच्या ग्राहक आणि आजूबाजूच्या नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मॉकड्रिल : ठाण्यात अतिरेकी शिरतात तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 9:00 PM
शहरात अतिरेकी शिरलेच तर पोलीस मुख्यालयाचे शीघ्र कृती दल किती वेळात आपली कामगिरी फत्ते करतात याचीच रंगीत तालीम (मॉकड्रील) ठाण्यात घेण्यात आली. यात पोलीस आणि नागरिकांचीही चांगलीच दमछाक झाली.
ठळक मुद्देतीन संशयित अतिरेकी एका मॉलमध्ये शिरल्याचा पोलिसांना मिळाला ‘मेसेज’शीघ्र कृती दलाची तात्काळ कारवाईअर्ध्या ते एक तासात मोहीम फत्ते