कसारा : ठाणे जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या माळ विहिगावसाठी एक मॉडेल तयार करून या संपूर्ण आदिवासी गावाचा विकास करून गोरगरीब आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी माळ येथे दिली.
गुरुवारी शहापूर तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तालुक्याचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूर तालुक्यातील मिनी महाबळेश्वर असलेल्या माळ गावात असलेल्या मिनी कासपठार, निळ्या रंगाचे दगड व धुक्याचे साम्राज्य असलेल्या उंच टेकड्या याबाबत माहिती दिली होती. जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे अ.अ. खंडारे, तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, वनविभागाचे अधिकारी व. तु. घुले, यांनी माळ गावाला भेट दिली. निसर्गाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले बळवंत गडाची पाहणी केली. माळ गावातील डोंगर, टेकड्यांचा वनविभागाच्या मदतीने विकास करून पर्यटनाला चालना मिळेल या दृष्टिकोनातून ग्रामीण संस्कृती व पर्यावरणाची कास धरत एक मॉडेल तयार केले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बळवंत गडाच्या विरुद्ध दिशेस असलेल्या या पठारावर पर्यटन क्षेत्र झाल्यास गावाच्या विकासाला चालना मिळेल. रॅपलिंग, झुलता पूल, सेल्फी पॉइंट, ग्रामीण संस्कृती जपणारे टेन्ट, रानभाज्या, रानमेवासाठी स्वतंत्र स्टॉल यासह पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक उपक्रम या माळपठारावर राबविण्यात येणार आहेत. दरम्यान, बळवंत गडाच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने आजपर्यंत श्रमदानातून किल्ल्यावरील शौचकूप, पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या आहेत. अडगळीतील मारुती मंदिर स्वच्छ केले आहे. मोठ्या प्रमाणात गडाची दुरुस्ती असल्याने त्यासाठी सरकार दरबारी संस्थेचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र माळ पठारास पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यास बळवंत गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची वाटही सोपी होईल.
-----------------------------------------------------------------------------------------
माळ गाव खरोखरच एक हिल स्टेशन आहे. उत्तम पर्यटन क्षेत्र या ठिकाणी होऊ शकते व त्याआधारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी आम्ही एक ग्रामीण संस्कृती व पर्यटन याआधारे एक मॉडेल तयार करून माळ गावाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करू.
- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी
माळ, विहिगाव या गावांना पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यास ऐतिहासिक गडकिल्ल्यांची जोपासनाही करता येईल. या मिनी महाबळेश्वर असलेल्या माळ पठाराला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- पांडुरंग बरोरा,
माजी आमदार