डोंबिवली : कल्याणमध्ये मेट्रो आणि सिडकोच्या गृहप्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार कपिल पाटील यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांची ओळख असलेली वारली पेंटिंग भेट म्हणून दिली. ही खास भेट पाहून पंतप्रधान मोदी भारावून गेले. आदिवासींच्या या जगप्रसिद्ध कलेला मोल नसल्याची दाद त्यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
२०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारावेळी मोदी यांनी कल्याणमध्ये प्रथमच सभा घेतली होती. त्यानंतर, पुन्हा कल्याणमध्ये आलेल्या मोदी यांच्या स्वागतासाठी भाजपासह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी त्यांना भेट काय द्यायची, यावर भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. मेट्रो किंवा कल्याणचे वैशिष्ट्य दर्शवणारे एखादे प्रतीक द्यावे, असे काहींचे म्हणणे होते. त्याचवेळी पाटील यांनी वारली चित्र देण्याची सूचना केली. त्याला सगळ्यांनी तत्काळ पसंती दिली. ठाणे व पालघरमधील मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींची ही वारली चित्रकला जगभरात पोहोचली आहे. पंतप्रधानांना भेट देण्यासाठी खास वारली चित्र काढून घेण्यात आले. ही अनोखी भेट पाहताच या कलेला मोल नसल्याचे उद्गार मोदी यांनी काढले.