भार्इंदर : मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षात एकही यशस्वी काम केलेले नाही. ते सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच अपयशी ठरल्याचा दावा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव बी. एम. संदीपकुमार यांनी केला आहे. ते भार्इंदर येथे आले असता त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी महाराष्ट प्रदेश काँग्रेसचे महासचिव राजेश शर्मा, सहप्रभारी मेहुल व्होरा, माजी आमदार मुझफ्फर हुसेन उपस्थित होते. मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवत संदीपकुमार यांनी मोदींनी केवळ ‘मन की बात’ मध्येच नागरिकांना गुरफटून ठेवल्याचा आरोप करत त्यांनी अद्याप एकही ‘काम की बात’ केली नसल्याचा टोला लगावला. आता या सरकारचे काही महिनेच उरले असताना आतातरी त्यांनी ‘काम की बात’ करावी, जेणेकरून त्याचा फायदा देशासह नागरिकांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मोदींनी ‘मन की बात’ चे व्रत सोडून पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या कंपनीची उलाढाल चार वर्षांतच कशी काय वाढली, मर्जीतल्या बड्या उद्योगपतींसाठी कमाल जमीन धारणा कायदा का रद्द केला, महागाई कशी वाढली यावर भाष्य करण्याचे आव्हान त्यांनी दिले.
काँग्रेसला येत्या निवडणुकीत जोमाने उतरायचे असल्याने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षबांधणीची जनसंपर्क मोहीम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. या मोहिमेद्वारे केंद्रातील मोदीप्रणित सरकारसह भाजपायुक्त राज्य सरकारच्या अपयशाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवली जाणार आहे. पक्षबांधणीसाठी केंद्रस्तरावर काम केले जाणार असून प्रत्येक केंद्रासाठी १० कार्यकर्त्यांची नियुक्ती करून त्यातील प्रत्येकावर २५ घरांच्या संपर्काची जबाबदारी सोपविली जाणार आहे.