ठाणे :अटलजींनी दाखविलेल्या मार्गावरूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या देशाला घेऊन जात असून भारताला विश्वगुरु करण्याचा निर्धार आपण करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईच्या दीप कमल फाउंडेशनतर्फे मीरा रोड येथील सेव्हन स्क्वेअर अकादमीच्या मैदानावर आयोजित अटल महाकुंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. भारताचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची २५ डिसेंबर रोजी जयंती असून यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अटलजींच्या कवितांच्या ओळीचा संदर्भ देऊन सांगितले की, अटलजी हे या देशातील असे राजनेता होते ज्यांना जनतेचे अपार प्रेम मिळाले. त्यांच्या कार्यसंस्कृतीची प्रेरणा घेऊनच मोदीजी कारभार करीत आहेत. या कार्यसंस्कृतीचा पायाच अटलजींनी रचला. जिथे जिथे अटलजींच्या अमृत विचारांचे थेंब पडले तिथे तिथे आपोआपच कुंभ निर्माण झाले, असेही मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले.
राजस्थानचे माजी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांना यावेळी "अटल सम्मान" देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे स्व. अटलजी यांची दीर्घकाळ सेवा करणारे शिवकुमार यांना देखील गौरविण्यात आले. प्रारंभी दीप कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरजीत मिश्र यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.
अटल गीत गंगा या कार्यक्रमात अभिनेता शेखर सुमन, रवि किशन, पूनम ढिल्लों , हिमानी शिवपुरी, कवि महेश दुबे, गायक विनोद दुबे व सुरेश शुक्ला यांनी अटलजी यांच्यावरील कवितांचे वाचन केले. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार नरेंद्र मेहता, बिहारचे मंत्री नंदकिशोर यादव यांची उपस्थिती होती. यावेळी अटलजींच्या भाषण आणि कवितांवर आधारित डॉक्युमेंट्री "शब्दों के शिल्पी अटल" दाखविण्यात आली.