बदलापूर : महाराष्ट्रातील नावाजलेल्या बांधकाम कंपन्यांपैकी एक असलेल्या मोहन ग्रुपच्या एका संचालकाचा शनिवारी मध्यरात्री संशयास्पद मृत्यू झाला. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांच्या मध्ये असलेल्या बेलवली फाटकाजवळ झालेल्या रेल्वे अपघाताची पोलिसांनी नोंद केली असली तरी हा अपघात आहे की घातपात, की आत्महत्या याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. उल्हासनगर येथे राहणारे मोहन ग्रुपच्या संचालकांपैकी एक अमर हरिश्चंद्र भाटिया (३०) हे संचालक आहेत. शनिवारी रात्री बेलवली रेल्वे फाटकाजवळ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दुरान्तो एक्स्प्रेसच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडे अपघाती निधनाची नोंद करण्यात आली आहे. मोहन ग्रुपची कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरात मोठमोठी गृहसंकुलांची कामे सुरू आहेत. या ग्रुपचे संचालक अमर भाटिया हे नेहमी आपल्या चारचाकी गाडीतून प्रवास करीत होते. बदलापुरात सुरू असलेल्या मोठ्या गृहप्रकल्पाची जबाबदारी त्यांच्यावर होती. ते काम करीत असताना अमर यांना अचानक बंद फाटकाच्या दिशेने जाण्याची गरज का भासली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. साधारणत: रात्री ८ ते ९ नंतर कार्यालयातून बाहेर पडणारे अमर हे रात्री १च्या सुमारास बदलापूरच्या रेल्वे फाटकात जाणे हेदेखील गूढ वाढविणारे आहे. (प्रतिनिधी)
मोहन ग्रुप संचालकाचा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: January 18, 2016 3:16 AM