प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : शून्य कचरा मोहिमेंतर्गत केडीएमसीने कचराकुंडीमुक्त शहर ही संकल्पना मांडली असली तरी आजही शहरातील बहुतांश ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात. कचऱ्याने अर्ध्या रस्त्यावर कब्जा केला असताना त्याच्या आजूबाजूला काही ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर असतो. आधीच अरुंद रस्ते त्यात जनावरांचा अडथळा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मोकाट जनावरांचे प्रमाण काहीअंशी कमी झाले असलेतरी या भटक्या आणि बेवारस जनावरांसाठी डोंबिवलीतील कोंडवाडा कधीच बंद झाला आहे. त्यामुळे केडीएमसीकडून अशा जनावरांवर कारवाई होत नसल्याचेही स्पष्ट होत आहे.
स्मार्ट सिटीच्या वल्गना करणाऱ्या केडीएमसीच्या नियोजनशून्य कारभारामुळे सध्या मनपा हद्दीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. खड्ड्यांच्या चाळणीमुळे रस्ते लुप्त पावले आहेत. काँक्रीटचे रस्तेही प्लेव्हरब्लॉक खचल्याने त्रासदायक ठरत आहेत. परिणामी पादचाऱ्यांसह वाहनचालकांची डांबरी आणि काँक्रीटच्या रस्त्यावरून जाताना अक्षरश: कसरत होत आहे. यात वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत असताना काही ठिकाणी मोकाट जनावरांचे बस्तानही तापदायक ठरत आहे. यात अपघातालाही निमंत्रण मिळते.
मलंगरोड, चक्कीनाका, पुणे-लिंक रोड, मोहने रोड, कल्याण-शिळ रोडवर मोकाट जनावरे रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी सर्रासपणे पहायला मिळतात. मोकाट जनावरांसाठी डोंबिवलीत कोंडवाडा होता. त्यात ठेवल्या जाणाऱ्या जनावरांसाठी लागणाऱ्या चारा खरेदीसाठी दरवर्षी विशेष निधीची तरतूद मनपाच्या अंदाजपत्रकात केली जात होती. परंतु, गेल्या काही वर्षांपासून कोंडवाडा बंद करण्यात आल्याने तो इतिहासजमा झाला आहे.
---------------------------------
त्यामुळे बंद झाला कोंडवाडा?
रस्त्यावरील उकिरड्यावर चरणारी मोकाट जनावरे प्लॅस्टिकचे बळी ठरत आहेत. प्राण्यांचा अकस्मात मृत्यू होण्यासाठी प्लॅस्टिक हा महत्त्वाचा घटक आहे. मोकाट जनावरांचा खाद्याचा प्रकार बदलल्याने अशी जनावरे पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवणेही जोखमीचे बनले आहे. काही ठिकाणी कोंडवाड्यात जनावरांचा मृत्यूही झाला आहे. हे वास्तव पाहता डोंबिवलीतील कोंडवाडाही बंद झाल्याची सूत्रांची माहिती आहे. काही संघटना जनावरांचे पालनपोषण करीत आहेत. यात मोकाट जनावरांची घटलेली संख्या हेदेखील कारण असल्याचे बोलले जात आहे.
-----------
भटक्या श्वानांची दहशत कायम
भटक्या श्वानांची समस्या गंभीर आहे. त्यांच्या उपद्रवामुळे बालके, नागरिक जखमी होत आहेत. बेवारस श्वानांची वाढती संख्या पाहता मनपाकडून केल्या जात असलेल्या निर्बीजीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-----------
..तर नोटीस दिली जाईल
मनपाचा कोंडवाडा बंद आहे. पण मोकाट जनावरे आढळल्यास संबंधित मालकांचा शोध घेऊन त्यांना नोटिसा बजावण्यात येईल.
- रामदास कोकरे, उपायुक्त, सार्वजनिक आरोग्य विभाग
---------------------