डोंबिवली- डोंबिवली शहरात गुरुवारपासून (6 ऑक्टोबर ) अचानक भारनियमन सुरू झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गुजरातमधील निवडणुकांमुळे हा निर्णय घेण्यात आला असेल तर ते चुकीचे आहे, डोंबिवलीकर ते कधीही सहन करणार नाही, असे सांगत मनसेच्या शहर कार्यकारणीने शुक्रवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोळसा भेट देत अनोखे आंदोलन केले. दिवाळी तोंडावर असताना भारनियमन होऊ नये म्हणून यावेळी अधिका-यांना कोळसा दिवाळी भेट म्हणून देण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या आधी कोळशाचे भाव वाढवण्यासाठी असे भारनियमन केले जाते असे म्हटले होते, तर मग आताही तोच उद्देश आहे का? असा सवाल उपाध्यक्ष राजेश कदम यांनी महावितरणचे एमयडीसीसी परिसरातील प्रभारी अधिकारी अविनाश काळढोन यांना केला. ऐन परीक्षा, सणवार असताना होणारे डोंबिवलीकर चाकरमान्यांचे हाल बंद व्हावेत यासाठी चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले भारनियमन तात्काळ रद्द करावे, अशीही मागणी मनसेने केली.
डोंबिवली शहर हे 'अ' दर्जाचे शहर असून या शहरातील नागरिक प्रचंड सहनशील आहे, पण त्याचा अंत बघू नका ते योग्य होणार नाही, असे मनसेने सांगत आगामी काळात याच कोळशाने तोंड काळे केले जाईल, असा इशारा दिला. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष मनोज घरत, यंदा पाटील, प्रतिभा पाटील, गटनेते प्रकाश भोईर, राहुल कामत यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनीही समस्या समजून घेत वरिष्ठ आदेश माथ्यावर असे स्पष्ट केले. पण शुक्रवारसाठी दुपारच्या भारनियमन वेळापत्रकातून सूट देण्यात आली असल्याचा निर्णय नुकताच झाल्याचे ते म्हणाले.