ठाणे : मोठ्या भावाच्या पत्नीचा विनयभंग केल्यानंतर उद्भवलेल्या वादातून सुधीर गुडाळे या मोठ्या भावाने गणेश या लहान भावावर चाकूने हल्ला केल्याचे प्रकरण शनिवारी कापूरबावडी पोलिसांनी दाखल केले. परस्परविरोधी तक्रारींवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या गणेशवर चरईतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.मानपाडा येथील शिवाजीनगरचा रहिवासी गणेश याने शनिवारी दुपारी विनयभंग केल्याची तक्रार त्याचा मोठा भाऊ सुधीर याच्या पत्नीने कापूरबावडी पोलिसांकडे दिली. या घटनेमुळे सुधीरने गणेशवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गणेशच्या पोटाला आणि मांडीला दुखापत झाली. जखमी अवस्थेत गणेशला आधी मानपाडा येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर, जिल्हा शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर पुन्हा चरई येथील संपदा या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वहिनीचा विनयभंग जाणीवपूर्वक केला नसल्याचे गणेशचे म्हणणे आहे. भावाने चाकूने हल्ला केल्यानंतर झटापटीत वहिनीला धक्काबुक्की झाली. विनयभंग जाणीवपूर्वक केला नाही, असा दावा गणेशने केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सुधीरने आपल्यावर चाकूहल्ला केल्याची तक्रार गणेशनेही कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.या घटनेनंतर सुधीर गुंडाळे स्वत:हून कापूरबावडी पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांनी दिली.
ठाण्यात दिराकडून भावजयीचा विनयभंग, धाकट्या भावावर चाकूने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 6:15 AM