ठाणे, दि. 2 - वर्षभरापूर्वी झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या सुनावणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा त्याच आरोपीने कोर्टाबाहेर विनयभंग केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली.15 वर्षीय पीडित मुलगी ठाण्यातील मिरा रोडची रहिवासी आहे. वर्षभरापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ती 29 जुलै रोजी आई-वडिलांसोबत ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयात आली होती. सुनावणी आटोपल्यानंतर दुपारी 12 वाजताच्या न्यायालयाच्या तीन नंबरच्या प्रवेशद्वाराजवळ आरोपीने तिचा विनयभंग केला. पुन्हा एकदा बलात्कार करण्याची धमकीही आरोपीने दिल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. तिच्या तक्रारीवरून ठाणोनगर पोलिसांनी 31 जुलै रोजी याप्रकरणी आरोपी जगजितसिंग स्वर्णसिंग हिन्ना आणि त्याची पत्नी मंगला जगजितसिंग हिन्ना यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.या तक्रारीच्या प्राथमिक तपासात पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित मुलीच्या आईने आंतरधर्मिय विवाह केला होता. पिडित मुलीवर वडिलच लैंगिक अत्याचार करतात, अशी तक्रार तिच्या आईने गतवर्षी काशिमिरा पोलीस ठाण्यात दिली होती. याशिवाय जगजितसिंग स्वर्णसिंग हिन्ना आणि पिडित मुलीमध्येही प्रेमसंबंध होते. या संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊन पिडित मुलीने त्याच्याविरोधातही लैंगिक अत्याचाराची तक्रार गतवर्षीच दिली होती. त्यानुसार नयानगर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आरोपीविरूद्ध दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यांची सुनावणी 29 जुलै रोजी ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये होती. सुनावणी आटोपल्यानंतर न्यायालयाबाहेर फिर्यादी आणि आरोपीकडील पुरूषांमध्ये जुंपली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी ठाणोनगर पोलीस ठाण्यात येऊन आरोपींनी विनयभंग केल्याची तक्रार दिली.पीडित मुलीच्या तक्रारीनुसार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु असल्याचे ठाणोनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक कुंभार यांनी सांगितले. आरोपींचे तीन पत्ते पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिले होते. मात्र त्या तिन्ही पत्त्यांवर आरोपींचा ठावठिकाणा नसल्याचे कुंभार यांनी सांगितले.
लैंगिक अत्याचाराच्या सुनावणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा कोर्टाबाहेर विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2017 8:05 PM