बदलापूर : बदलापूर पश्चिमेतील चंद्रशेखर मेमोरियल हायस्कूलमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेतील शिपायाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. मार्च महिन्यात झालेल्या या प्रकाराबाबत शाळा प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने अखेर मनसे कार्यकर्त्यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारत शिपायाला मारहाण केली. त्यानंतर, त्यांनीच शिपायाला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिपायाला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
बदलापूर पश्चिमेतील बॅरेज रस्त्यावर चंद्रशेखर मेमोरियल हायस्कूल आहे. या शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाºया नऊवर्षीय विद्यार्थिनीने शाळेतील शिपाई ओमप्रकाश सिंग याने विनयभंग केल्याची तक्र ार तिच्या आईकडे केली होती. त्यानुसार, २२ मार्च रोजी विद्यार्थिनीच्या आईने शाळा प्रशासनाकडे धाव घेतली होती. त्यानंतर, संबंधित शिपायावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शाळेचे मुख्याध्यापक सतीशचंद्र पांडे यांनी दिले होते. मात्र, शिपायावर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप तक्र ारदार आईने आपल्या तक्र ारीत केला आहे. कोणतीही कारवाई होत नसल्याने पालकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. बुधवारी मनसे महिला अध्यक्ष संगीता चेंदवणकर, संजय पुजारी, जयेश कदम आणि इतर पदाधिकाºयांनी पालकांसोबत शाळा प्रशासनाची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिपाई सिंग याला मारहाण करत पोलिसांकडे स्वाधीन केले. ओमप्रकाश सिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शाळेत मनसेने घातलेल्या गोंधळानंतर शाळा प्रशासनाने मनसे शहर महिलाध्यक्ष संगीता चेंदवणकर यांच्यासह इतर पाच ते सहा मनसे पदाधिकाºयांवरही गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी सांगितले दोन्ही पक्षांकडून दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल केले आहेत.