ठाणे : कळवा येथील महापालिकेच्या रूग्णालयामध्ये प्रसुतीसाठी भरती झालेल्या एका महिलेचा चक्क डॉक्टरनेच विनयभंग केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. कळवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.दिवा (पूर्व) येथील २२ वर्षीय महिलेला प्रसुतीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी रूग्णालयामध्ये ७ डिसेंबर रोजी सकाळी भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास महिलेची प्रसुती होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाले. मात्र मुलीचे वजन कमी असल्याने तिला नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले होते. रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास पीडित महिलेला बाळाला दुध पाजण्यासाठी अतिदक्षता विभागात पाठविण्याचे प्रसुतीगृहाच्या फोनवर सांगण्यात आले. पीडित महिलेला हा निरोप मिळाल्यानंतर ती अतिदक्षता विभागामध्ये गेली. त्यावेळी तेथील परिचारिकेने दुध पाजण्यासाठी नव्हे तर मुलीला स्वच्छ करण्यासाठी बोलविले असल्याचे सांगितले. त्यानुसार मुलीची स्वच्छता आटोपल्यानंतर महिला स्वत:च्या वॉर्डामध्ये परत जात असताना डॉक्टरांचा पांढºया रंगाचा कोट आणि तोंडाला मास्क लावलेल्या आरोपीने तिला अडवले. मुलीला दुध पाजले का, अशी विचारणा आरोपीने महिलेला केली. त्यावर दुध पाजण्यासाठी नव्हे तर बाळाच्या स्वच्छतेसाठी आपण आलो असल्याचे महिलेने सांगितले. त्यानंतर आरोपीने महिलेला जवळ ओढून तिचा गाऊन फाडला. महिलेने झटापट करून स्वत:ची सुटका करून घेतली.पीडित महिलेने याप्रकरणी रविवारी सायंकाळी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली. महिलेचा विनयभंग करणारा आरोपी डॉक्टरच होता की डॉक्टरच्या वेशात आणखी कुणीतरी होता, याचा शोध सुरू असल्याचे बागडे यांनी सांगितले. त्यासाठी रूग्णालयाच्या अधिष्ठातांकडून माहिती घेतली जात असून, सीसीटीव्ही फुटेजही पडताळले जात असल्याची माहिती बागडे यांनी दिली.
ठाण्यात प्रसुतीसाठी भरती झालेल्या महिलेचा डॉक्टरकडून विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 5:18 PM
ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील रूग्णालयामध्ये प्रसुतीसाठी भरती असलेल्या एका महिलेचे कपडे फाडून डॉक्टरने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने तोंडाला बुरखा बांधलेला असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचण येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
ठळक मुद्देमहापालिकेच्या रूग्णालयातील घटनामहिलेचा गाऊन फाडलाआरोपीचा शोध सुरू