ठाणे : जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसूती वॉर्डमध्ये मोबाइलद्वारे शूटिंग करणाऱ्या चौघांना अडवण्याचा प्रयत्न करणा-या महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी त्या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून रविवारी पहाटे तिघांना अटक केल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली. मागील तीन महिन्यांतील जिल्हा रुग्णालयातील विनयभंगाची ही चौथी घटना आहे. यातील तीन घटनांमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांचा विनयभंग झाला असून आता रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्टरचा विनयभंग झाला आहे.अंबरनाथ येथील सात महिन्यांची गरोदर असलेल्या एका महिलेला २७ जून २०१८ रोजी पोटात दुखत असल्याने ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील लेबर वॉर्डमध्ये उपचारार्थ भरती केले होते. उपचारादरम्यान केलेल्या तपासणीत त्या महिलेची प्रकृती नाजूक आणि तिच्या पोटात असलेल्या बाळाची पुरेशी वाढ झाली नसल्याचे समोर आले. दरम्यान, तिच्या नातेवाइकांनी तिची प्रसूती नैसर्गिक व्हावी, असे सांगितल्यावर तिची नैसर्गिकरीत्या प्रसूती व्हावी, यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. शनिवारी रात्री अचानक त्या महिलेचा पती, भाऊ आणि तिच्या पतीचे दोन मित्र अशा चौघांनी रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांवर योग्य उपचार करत नाही, असा आरोप करत प्रसूती वॉर्डमध्ये शिरकाव करून मोबाइलद्वारे शूटिंग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या वॉर्डमध्ये ड्युटीवर असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ महिला डॉक्टर यांनी चौघांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी झटापट करून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी डॉक्टर महिलेने ठाणेनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून खारेगाव येथील विकी मिलिंद कदम (३२). सागर दत्तू पाटील (२५), अंबरनाथ येथील दिगंबर अभिमान कसबे (२६) आणि साता-यातील मंगेश दिलीप किरतकर (३०) या चौघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणि विनयभंग केल्याचा रविवारी पहाटे गुन्हा दाखल झाला. त्यातील विकी, सागर आणि मंगेश या तिघांना अटक केली. त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक एस.एस. कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान, गरोदर महिलेची आणि तिच्या बाळाची प्रकृती नाजूक असल्याने तिला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरचा विनयभंग; तिघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:26 AM