अनिकेत घमंडी।
डोंबिवली :मध्य रेल्वेवरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी महिला विशेष लोकल सुरू झाल्यानंतर आता १० आॅक्टोबरनंतर धीमी लोकल सुरू करण्याच्या निर्णयावर रेल्वे व राज्य सरकार विचाराधीन आहे, अशी माहिती दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळणाºया अधिकाऱ्यांनी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेला दिली. दरम्यान, बुधवारपर्यंत संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठांसमवेत बैठक होणार असून त्यात निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, मनोहर शेलार म्हणाले की, ‘रेल्वेकडे महासंघाचा जूनपासून विविध मागण्यांसाठी पाठपुरावा सुरूच आहे. त्यानुसार, गुरुवारी एका अधिकाºयाने सांगितले की, पूर्वीप्रमाणे मध्य रेल्वेवर जलद, धीम्या लोकल पुढील आठवड्यानंतर धावतील. तसेच सध्याच्या लोकल फेºयांमध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यात खासगी क्षेत्रातील कर्मचाºयांनाही प्रवासाची मुभा देण्याचा विचार होऊ शकतो.’मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हाच मुख्य उद्देश आहे. सामान्यांचे हाल सुरू असल्याने त्यासंदर्भातही सरकार गंभीर आहे. धीम्या लोकल सुरू झाल्यास जलद लोकल पूर्वीप्रमाणे धावतील. धीम्या लोकल सर्व स्थानकांत थांबणार असल्याने कर्जत, कसारा तसेच मुख्य मार्गावरील लहान स्थानकांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच सध्या त्यांना इच्छित स्थानकापर्यंत प्रवास करताना करावा लागणार द्राविडी प्राणायाम थांबेल. तसेच वेळ व पैशांचा होणार अपव्यय टळेल, असे ते म्हणाले.विशिष्ट रंगसंगती, वेळेनुसार स्थानकात प्रवेश?खासगी कंपन्या, कार्यालये ३० टक्के कर्मचाºयांसह सुरू करण्याची परवानगी अनलॉक-५ मध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाºयांना प्रवासाची संधी दिल्यास लोकलची गर्दी वाढेल. त्यासाठी गर्दी विभागण्यावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार, एखाद्या मोबाइल अॅपद्वारे विशिष्ट रंगसंगती देऊन त्या रंगानुसार एक वेळ निश्चित केली जाईल. त्यावरून संबंधित कर्मचारी प्रवास करू शकेल. दरम्यान, या पद्धतीच्या अंमलबजावणीसाठी सुरक्षा यंत्रणेसोबत चर्चा, अभ्यास सुरू असल्याचे सांगण्यात आले.