कल्याण : शहाड परिसरातील सोहम फाउंडेशनने यंदा पर्यावरणस्नेही लाल मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. या गणेशमूर्तींच्या विक्रीतून जमा झालेला पैसा युसूफ मेहर अली सेंटरला दिला जाणार आहे. या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी केला जाणार आहे.शहाड फाटक येथे फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र देठे यांनी या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. ते म्हणाले की, या मूर्तींच्या विक्रीमागे नफा कमाविणे हा उद्देश नाही, तर पर्यावरण जपणे हा मूळ उद्देश आहे.फाउंडेशन चार वर्र्षांंपासून शिक्षण, आरोग्य आणि महिला उत्थानासाठी काम करीत आहे. फाउंडेशनने गतवर्षी उल्हास नदीत रायते पुलाजवळ विसर्जित केलेल्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती नदीपात्रातून काढताना जवळपास दीड ते दोन टन गाळ काढला होता. नदी स्वच्छ केली होती. या उपक्रमात अन्य सामाजिक व पर्यावरण संस्थाही सहभागी झाल्या होत्या.लोक पर्यावरण जपण्यासाठी शाडूच्या मूर्ती घेतात. त्या पर्यावरणस्नेही असल्या तरी शाडूच्या मातीच्या मूर्ती घरी विसर्जन करून त्यांची माती पुन्हा नदी, तलाव व वाहत्या पाण्यातच विसर्जित करतात. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाचा खरा हेतू साध्य होत नाही.राजेंद्र देठे पुढे म्हणाले, फाउंडेशनने यंदा काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने युसूफ मेहर अली सेंटरला भेट दिली. पेण ही गणेशमूर्ती तयार करणाऱ्यांची पंढरी समजली जाते. तेथे नजीकच्या एका आदिवासी गावातील आदिवासी मुलामुलींनी या लाल मातीच्या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. त्या युसूफ मेहर अली सेंटरमध्ये होत्या. त्यापैकी ५० मूर्ती साहेम फाउंडेशनने घेतल्या आहेत. या मुर्त्यांचे ५५ हजार रुपये फाउंडेशनने आधीच सेंटरला भरले आहेत. त्या पैशांचा उपयोग शिक्षणासाठी केला जाणार आहे. फाउंडेशनने आणलेल्या ५० मूर्तींपैकी आतापर्यंत ३७ मूर्ती विकल्या गेल्या आहेत. दीड व दोन फुटांच्या मूर्ती आहेत.>तुळशीच्या बियाही देणारपहिल्याच वर्षी मिळालेला प्रतिसाद हा फाउंडेशनचा उत्साह वाढविणारा आहे. मूर्ती खरेदी करणाºयास तुळशीच्या बियाही दिल्या जात आहेत. लाल मातीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यावर त्या मातीत तुळशी बिया लावून तुळशीची रोपे उगविता येऊ शकतात, असे देठे यांनी सांगितले.
गणेशमूर्ती विकून जमलेले पैसे देणार मुलांच्या शिक्षणासाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 12:35 AM