उल्हासनगर : महापालिका सफाई कामगारांना गणवेश, बूट, रेनकोट घेण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. व्हीटीसी ग्राऊंड येथील प्रभाग समिती कार्यालयात सफाई कामगार यांच्यासाेबत संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.
उल्हासनगर महापालिकेतील सफाई कामगारांना दोन वर्षांपासून गणवेश, रेनकोट, बूट यांसह इतर साहित्य देण्यात आले नव्हते. कामगार संघटनेने सफाई कामगारांच्या समस्या मांडून गणवेशासह इतर साहित्य त्यांना देण्याची मागणी केली. यापूर्वी ठेकेदारामार्फत गणवेश, रेनकोट, बूट, छत्री आदींसह इतर साहित्य देण्यात येत होते. गणवेशाचा दर्जा व किंमत याबाबत प्रश्न निर्माण झाला हाेता. अखेर महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी गणवेश, रेनकोटसह इतर साहित्य खरेदीसाठीची किंमत कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांत कामगारांच्या खात्यात हे पैसे जमा हाेतील, असे आयुक्तांनी सांगितले.
महापालिकेत वर्षानुवर्षे रखडलेली कामगारांची पदोन्नती, अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया आदी अनेक प्रश्न सोडविल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. यावेळी उपायुक्त गणपतराव जाधव उपस्थित होते. कामगार संघटनेचे नेते राधाकृष्ण साठे यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानून गणवेश खरेदीतील ठेकेदारी पद्धत बंद केल्याबद्दल आयुक्तांचे अभिनंदन केले.
चौकट
‘गणवेशाच्या किमतीत वाढ करा’
महापालिका प्रशासनाने सफाई कामगारांच्या गणवेश खरेदीतील ठेकेदारी पद्धत बंद करून थेट सफाई कामगारांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कामगार संघटनेचे नेते चरणसिंग टाक यांनी महापालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले. तसेच गणवेशासाठी देण्यात येत असलेली रक्कम अपुरी आहे. बाजार किमतीच्या प्रमाणात गणवेशाची किंमत महापालिकेने दिल्यास सफाई कामगारांत आनंदाचे वातावरण दिसेल, अशी सूचना आयुक्तांना केली.