मीरारोड - गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर शिफ्टिंग संक्रमण शिबिरातील काही रहिवाश्यांना चावणाऱ्या एका मादा माकडास वनविभागाने पकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले. सदर माकडाच्या काहीजण खोड्या काढत असल्याने तो काहींचा चावा घेत सुटला होता.
घोडबंदर शिफ्टिंग हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लगत आहे. गेल्या काही महिन्यां पासून ह्या भागात एक मादा माकडचा वावर होता. सदर माकडास स्थानिक अनेक महिला व रहिवाशी हे जेवण तसेच खाद्य पदार्थ त्याला देत असत. काहींच्या तर माकड घरात जाऊन खात असे .त्याच्याकडून कोणाला काही इजा वा त्रास नसला तरी काही उनाड प्रवृत्ती त्या माकडास दगड मारणे, त्रास देणे आदी प्रकार सुरू केले. त्यामुळे माकडाने काहींना चावे घेण्याचे प्रकार सुरू झाले.
सदर प्रकाराबाबत मनसेच्या कल्पना साळूंके यांच्या कडे तक्रारी आल्या असता त्यांनी पर्यावरणा साठी कार्य करणाऱ्या मनसेच्या सचिन जांभळे यांना कळवले. जांभळे यांनी वन विभागाच्या येऊर येथील अधिकारी राजेंद्र पवार यांना निवेदन केले व सदर माकडास पकडून जंगलात सोडण्याची विनंती केली.
घोडबंदर वन अधिकारी मनोज पाटील यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान च्या पथकासह माकडास पकडण्यासाठी पिंजरा लावला. अखेर शनिवारी त्या माकडाला पकडण्यात यश आले. माकडाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेऊन सोडण्यात आले.