मीरा रोड : महापालिकेने भाड्याने दिलेल्या मीरा रोडच्या वर्धमान फॅन्टेसीमध्ये खेळातील ट्रेन वेगाने चालविल्याने डबा घसरून झालेल्या अपघातात आई व मुलगा जखमी झाल्याप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मीरा गावात राहणाऱ्या स्वप्नाली परब या मुलगा प्रतीश (वय ५) व पती महादेव असे १३ मार्चला मीरा रोडच्या शिवार तलाव येथील वर्धमान फॅन्टेसी येथे विरंगुळ्यासाठी गेले होते. प्रतिशला लहान मुलांच्या ट्रेनमध्ये बसायचे असल्याने स्वप्नाली या त्याला घेऊन शेवटच्या डब्यात बसल्या. ट्रेनचालकाने ट्रेन ही नियमित वेगापेक्षा अधिक वेगाने निष्काळजीने चालवल्याने ट्रेनचा शेवटचा डबा रुळावरून घसरून तिरपा झाला. त्यामुळे त्या डब्यातील स्वप्नाली व प्रतिश हे दोघेही बाहेर फेकले गेले.
प्रतिश तर सुमारे पाचे ते सात फूट लांब जाऊन पडला. त्यामुळे त्याच्या डाव्या खांद्यास मार लागून फ्रॅक्चर झाला व उजव्या बाजूच्या गालावर खरचटले. तर स्वप्नाली यांच्या नाकाच्या खाली, ओठाला मार लागून रक्त आले. तसेच उजव्या पायालाही खरचटले. जखमी आई व मुलास उपचारासाठी पाठवण्याऐवजी ट्रेन चालकाने उलट अरेरावी करत त्यांच्याशीच हुज्जत घातली.
‘व्यवस्थापकावरही कारवाई करा’अखेर महादेव हे पत्नी व मुलास मीरा रोडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. याप्रकरणी सोमवारी मीरा रोड पोलीस ठाण्यात ट्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर वर्धमान फॅन्टेसीच्या व्यवस्थापकावरही कारवाईची मागणी होत आहे.