ठाणे : वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडे खंडणीची मागणी करणा-या सतीश मांगले याच्या बॉडीगार्डला ठाणे खंडणीविरोधी पथकाने शनिवारी अटक केली. अतुल तावडे (२६, रा. नालासोपारा) असे त्याचे नाव असून, तो सतीश याच्या पहिल्या पत्नीचा भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली.मोपलवार यांच्याकडे १० कोटींची खंडणी मागणा-या मांगले आणि दुसरी पत्नी श्रद्धा यांना पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. शनिवारी सकाळी अतुल याला डोंबिवलीतून अटक केली. अतुल हा मागील १४ महिन्यांपासून सतीशचा बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत वावरत होता, तसेच तो मोपलवार यांच्यासोबत झालेल्या तिन्ही बैठकांमध्ये सहभागी होता. मांगले याने मोलपवार यांच्याविरोधात विविध सरकारी कार्यालयांत केलेले अर्ज पोहोचवणे व त्याचा जेवणाचा डबा आणून देण्याचे काम अतुल करत होता. काही दिवसांपूर्वी अतुलने सातारा पोलिसांकडे आपले अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर, नालासोपारा येथे राहणारा अतुल हा मांगलेचा बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत फिरायचा. खंडणीवसुलीच्या प्रकरणात अतुल याचा सकृतदर्शनी सहभाग दिसून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यावर त्याला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.उकळलेले पैसे हस्तगत करणार!प्रायव्हेट डिटेक्टिव्हचे काम करताना मांगले याने किती जणांकडून अशा पद्धतीने खंडणी उकळली, याचा शोध सध्या पोलीस घेत असून, त्याच्याकडून उकळलेले पैसे हस्तगत करू, असा विश्वास एका वरिष्ठ अधिकाºयाने वर्तविला.आणखी काहींना होणार अटकखंडणीवसुलीच्या या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक झाली असली, तरी मांगलेचा साथीदार अनिल वेदमेहता हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू असून, त्याच्यासह आणखी चार ते पाच जणांचा या खंडणीवसुलीच्या रॅकेटमध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे. त्या साºयांनाच लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मोपलवार खंडणी प्रकरण: सतीश मांगलेच्या बॉडीगार्डला अटक, मेहुण्यालाच नियुक्त केले सुरक्षारक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 3:11 AM