ठाणे : सनदी अधिका-याकडून खंडणी उकळणारा आरोपी सतीश मांगले हा श्रीलंकेच्या सिम कार्डवरून गँगस्टर रवी पुजारीच्या संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमोर केला. दोघांमधील संबंधांचा मुद्दा मांडल्यानंतर न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडी २ डिसेंबरपर्यंत वाढविली.रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची लाचेची मागणी करणारी ध्वनिफीत परत करण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी घेताना खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगले, त्याची दुसरी पत्नी मराठी अभिनेत्री श्रद्धा यांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वयेही कारवाई करण्यात आली असून, त्या अंतर्गत आरोपींची चौकशी सुरू आहे. सतीश मांगलेकडे पोलिसांना श्रीलंकेचे सिम कार्ड मिळाले. या सिम कार्डने व्हीओआयपी कॉल करून तो गँगस्टर रवी पुजारीच्या संपर्कात होता, असा दावा खंडणीविरोधी पथकाने केला. मांगलेविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी रवी पुजारीने राधेश्याम मोपलवार यांना धमकी दिली होती. पुजारीने दिलेली धमकी आणि मांगलेकडे मिळालेले श्रीलंकेचे सिम कार्ड यावरून दोघांमधील संबंध स्पष्ट होत असल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केला. या मुद्द्यावर आणखी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी मांगलेच्या पोलीस कोठडीची मागणी केली.सतीश मांगलेचा पासपोर्टही पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यावरून तो श्रीलंका, बँकॉक आणि नेपाळचे वारंवार दौरे करायचा, हे उघड झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ज्या दिवशी मांगलेला पोलिसांनी अटक केली, त्या दिवशी तो श्रीलंकेला पळून जाण्याच्या बेतात होता, अशी माहितीही सूत्रांनी दिली.धागेदोरे गुलदस्त्यातसतीश मांगले गोरखधंद्यासाठी श्रीलंकेचे सिम कार्ड वापरायचा, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याशिवाय, त्याचे श्रीलंकेला नेहमी येणे-जाणे असायचे, हेदेखील त्याच्या पासपोर्टवरून स्पष्ट झाले आहे.मात्र, श्रीलंकेला वारंवार जाण्याचे कारण काय, हे मात्र तपासातून अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मुद्द्यावर चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोपलवार खंडणी प्रकरण : श्रीलंकेच्या सिम कार्डवरून मांगले पुजारीच्या संपर्कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 5:36 AM