राजू ओढे ठाणे : खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगलेने सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणीपोटी नाशिक येथील एक फ्लॅटही स्वत:च्या नावावर करून घेतल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. हा फ्लॅट जप्त करण्याची तयारी पोलिसांनी चालविली आहे.रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची लाचेची मागणी करणारी ध्वनिफीत परत करण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी घेताना, खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगले, त्याची दुसरी पत्नी अभिनेत्री श्रद्धा आणि सतीशचा मेहुणा अतुल तावडे यांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने तीन आठवड्यांपूर्वी अटक केली होती. दरम्यानच्या काळात मांगलेविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी गँगस्टर रवी पुजारीने मोपलवार यांना धमकी दिल्यानंतर, या प्रकरणी मकोका अन्वयेदेखील कारवाई करण्यात आली. तिन्ही आरोपी २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.खंडणीच्या उद्योगातून दहावी पास मांगलेने जमविलेल्या मालमत्तेची माहिती पोलिसांनी चौकशीदरम्यान घेतली. मोपलवार यांच्याकडून खंडणीपोटी त्याने मोठी रक्कम वसूल केली. नाशिक येथील इंदिरा नगरातील अरावली को-आॅपरेटिव्ह सोसायटीमध्ये राधेश्याम मोपलवार यांच्या मुलीच्या नावे फ्लॅट होता. धमक्या देऊन मांगलेने तो स्वत:च्या नावावर करून घेतल्याची माहिती पोलीस सूूत्रांनी दिली. हा फ्लॅट जवळपास ८00 चौरस फूट आकाराचा असून, जवळपास दीड वर्षापूर्वी हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या ताफ्यात मर्सिडिज, बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या गाड्या असून, त्याने स्थावर मालमत्ताही मोठ्या प्रमाणात जमविली आहे.>फ्लॅट जप्तीची प्रक्रियामोपलवार यांचा नाशिकमधील फ्लॅट मांगलेने दीड वर्षापूर्वी स्वत:च्या नावावर करून घेतला. संबंधित यंत्रणेकडून याबाबत चौकशी केली जाणार आहे. तो खंडणीपोटी बळकावल्याचे स्पष्ट झाल्यास, जप्त करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोपलवार यांच्या मुलीचा फ्लॅटही बळकावला, आरोपींच्या मालमत्तेचीही चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 5:49 AM