ठाणे : आरोपींनी बेकायदेशीररीत्या सीडीआर (कॉल्सचा तपशील) मिळवलेल्या आणखी १२0 मोबाइल नंबर्सची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याबाबतचा तपशील पोलिसांनी संबंधित मोबाइल कंपन्यांकडून मागवला आहे.सीडीआर प्रकरणात पोलिसांना यापूर्वी २८४ मोबाइल नंबर्सची माहिती मिळाली होती. या नंबर्सचे सीडीआर आरोपींनी बेकायदेशीर मिळवले होते. यासंदर्भात पोलिसांनी संबंधित मोबाइल कंपन्यांकडून तपशील मागवला. मोबाइल नंबर्सचे सीडीआर विशिष्ट दर्जाच्या अधिकाऱ्याच्या सूचनेवरूनच कंपन्यांनी द्यावेत, असा नियम आहे. त्यामुळे आरोपींना हे सीडीआर कुणाच्या सूचनेवरून पुरवण्यात आले, याची माहिती पोलिसांनी मागवली होती. २८४ पैकी जवळपास निम्म्या मोबाइल नंबर्सची माहिती पोलिसांना कंपन्यांकडून मिळाली होती. काही प्रकरणांमध्ये पोलीस अधिकाºयांच्या शासकीय ई-मेलचा दुरुपयोग झाल्याचे या माहितीमधून उघडकीस आले. त्यानुसार यवतमाळ पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस शिपायास पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी गत आठवड्यात आसाम पोलिसांनीही एका पोलीस शिपायास अटक केली होती. याच धर्तीवर काही पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये अंतर्गत चौकशी सुरू आहे. दरम्यानच्या काळात पोलिसांना आणखी १२० मोबाइल नंबर्सची माहिती मिळाली. या या नंबर्सचे सीडीआर आरोपींना कसे पुरले, याची माहिती कंपन्यांकडून मागवण्यात येत आहे. ती मिळाल्यावर त्याचे विश्लेषण करून त्यानुसार कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बेकायदेशीर सीडीआर मिळवलेल्या मोबाइल नंबर्सची संख्या ४०० च्या घरात पोहोचली आहे. या नंबर्समध्ये काही नंबर्स परराज्यांमधीलही असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.>आसामच्या आरोपी पोलिसाचा ताबाठाणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी एकाजवळून आसामच्या पोलीस शिपायाने सीडीआर मिळवल्याची माहिती उघडकीस आली होती. त्याला अटक करताना आसाम पोलिसांनी वेगळा गुन्हा दाखल केला. त्यांनी वेगळा गुन्हा दाखल केल्याने ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये या आरोपीचा ताबा कसा घेता येईल, याबाबत कायदेशीर पडताळणी ठाणे पोलिसांकडून केली जात आहे.
आणखी १२० मोबाइल क्रमांकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 5:11 AM