ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिकेबरोबर सर्व पक्षांनी खबरदारी घेतली होती. परंतु, तरीही राबोडी भागात काही विचित्रच परिस्थिती पाहण्यास मिळाली. येथील बहुतेक सोसायटींचे मतदान केंद्र हे सरस्वती स्कूलमध्ये होते. परंतु, मतदान करण्यासाठी गेलेल्या सुमारे दीड हजार नागरिकांना आपला हक्क बजावता न आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. मागील विधानसभा निवडणुकीतही मतदान केले असतांना अचानक यादीतून नाव गायब झालेच कसे, असा सवाल उपस्थित करुन त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाबदेखील विचारला. परंतु, त्यांच्या पदरी निराशाच आली. विशेष म्हणजे यामध्ये मराठी मतांचा टक्का हा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.ठाणे महापालिका हद्दीत असलेला राबोडी हा भाग येथे घडलेल्या दंगलीमुळे फारच चर्चेत आला होता. त्यामुळे हा भाग विशेष करुन निवडणुकीतही रडारवर येण्याची शक्यता असल्याने तो संवेदशनील मतदान केंद्र म्हणूनच घोषित करण्यात आला होता. मंगळवारी सकाळी येथील विविध केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरु होती. काही ठिकाणी आईवडिलांची नावे गहाळ झाली होती तर त्यांच्या मुलाचे नाव यादीत होते, काही ठिकाणी तर अख्या कुटुंबाचेच नाव यादीतून गायब झाले होते. शिवाय मतदार यादींमधील घोळामुळेदेखील मतदार अधिकच हैराण झाल्याचे चित्र होते. दरम्यान दुपारी ११.४५ च्या सुमारास सरस्वती शाळेत अनेक जण मतदान करण्यासाठी जात होते. परंतु,त्यांचे नावच यादीत न सापडल्याने त्यांनी परतीचा मार्ग स्वीकारला. हा आकडा हळूहळू दीड हजारांच्या घरात गेला. मागील कित्येक वर्षे मतदान करीत असतांना अचानकपणे मतदार यादीतून नाव गहाळ झालेच कसे याचा जाब विचारण्यासाठी आकाशगंगामधील ४०० च्या आसपास मतदारांसह तुकाराम पार्क, लक्ष्मी पाटील रोड आदी भागातील रहिवासी मतदान केंद्रावर धडकले. त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडूनदेखील अरेरावीची उत्तरे मिळाली. त्यामुळे हे मतदार आणखीनच हैराण झाले होते. अखेर याठिकाणी एसआरपीएफ आणि पोलिसांच्या एका तुकडीला पाचारण करण्यात आले. त्यानंतर मतदारांची समजूत काढण्यात आली. परंतु, त्यांच्या पदरी निराशाच आली, आणि या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. (प्रतिनिधी)मागील ६० वर्षे मी मतदान करीत आहे, परंतु, आज मतदान करण्यासाठी आलो असता माझे नावच यादीत नव्हते. त्यामुळे मला मतदानपासून वंचित राहावे लागले.- नलिनी धुरी, ८० वर्षीय वृद्धामागील लोकसभा, विधानसभेला मतदान केले असतांनादेखील मला आता अचानक मतदार यादीत नाव नसल्याचा धक्का बसला अशा पद्धतीने जर काम होत असेल तर याला जबाबदार कोण.- प्रमिला पाटील, मतदार, राबोडीकुटुंबातील इतर सदस्यांची नावे आहेत. मुलाचेही नाव आहे, पण आमची नावे मतदार यादीत नाही.- नंदकुमार भोसले, मतदारमतदार यादीतून दीड हजाराहून नावे गहाळ झाली असून मी गेली २५ ते ३० वर्षापासून मतदान करीत आहे. माझा मतदानाचा हक्क हिरावून घेण्यात आला असून याला जबाबदार शासन असून, त्यांनी जाणूनबूजून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले आहे.- केदार दिघे, शिवसेनेचे पदाधिकारी प्रारुप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर सात दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक मतदात्याने याद्यांमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करणे गरजेचे होते. परंतु, त्यांच्याकडून हे झाले नसल्याने असा प्रकार घडला असावा.- संदीप माळवी, उपायुक्त, महापालिका, ठाणे
राबोडीतील दीड हजारांहून अधिक मतदार राहिले वंचित
By admin | Published: February 22, 2017 6:19 AM