ठाणे : फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर कोरोनाने पुन्हा हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असून, मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रुग्णांच्या आकडेवारीने हजारचा टप्पा गाठला. दिवसेंदिवस होत असलेल्या रुग्णवाढीमुळे मृत्यूसंख्याही वाढत आहे. मार्च महिन्याच्या अवघ्या २२ दिवसांत नव्या रुग्णांची संख्या २५ हजारांहून अधिक झाली असून, याच कालावधीत १२० जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा ठाणे जिल्ह्यात शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला त्या वेळी तुरळक प्रमाणात रुग्णांची नोंद झाली होती. कालांतराने रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. दोन अंकी रुग्णांची संख्या तीन आणि चार अंकी झाली. त्या वेळी प्रतिदिन आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या एक ते दोन हजारांच्या घरात पोहोचली होती. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या ४० ते ५० च्या घरात गेली होती. त्यात हा आजार नवा असल्याने उपचारपद्धतीदेखील नीटशी माहीत नव्हती. अशा परिस्थितीतही आरोग्य विभाग दिवसरात्र या आजाराशी लढा देत आहे. ऑक्टोबरनंतर हळूहळू रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश आले होते. अशातच राज्याचा आर्थिक विकासाचा गाडा रुळावर आणण्यासाठी टाळेबंदीत शिथिलता देण्यात आली. त्यानंतरही काही दिवस रुग्णांची संख्या आटोक्यात होती. त्या वेळी जिल्ह्यात आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या २०० ते ३०० च्या घरात होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. २०० ते ३०० च्या घरात असलेल्या रुग्णांची संख्या ५०० च्या वर पोहोचू लागली. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर रुग्णांच्या संखेने उच्चांक गाठला. तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर १० मार्च रोजी सर्वाधिक एक हजार रुग्णांची नोंद करण्यात आली. २१ मार्च रोजी नव्या रुग्णांच्या आकडेवारीने तब्बल दोन हजारांचा टप्पा पार केला.
......................
२८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात एकूण दोन लाख ६४ हजार ९१८ रुग्णांची, तर सहा हजार २७२ मृत्यूची नोंद करण्यात आली. २२ मार्च रोजी नव्याने आढळून येणारे रुग्ण २५ हजार ७००, तर १२० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधित रुग्णांची एकूण संख्या दोन लाख ९० हजार ६१६, तर ६ हजार ३९२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
.........................