उल्हासनगर : शहरात शंभर रूपयाच्या बनवाट नोटा चलनात आणणा-या दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्यांच्याकडून ४३ हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या असून ५० हजारापेक्षा जास्त बनावट नोटा चलनात असल्याची धक्कादायक कबुली पोलिसांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथे राहणारी महिला १०० रूपयाच्या बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. खब-याच्या माहितीनुसार गजानन मार्केट परिसरात सापळा लावण्यात आला. एका दुकानात बनावट नोटा चालविताना मिता उर्फ हरी विवेक मलानी या महिलेला अटक केली. महिलेच्या अंग झडतीत ११ हजारापेक्षा जास्त बनावट नोटा मिळाल्या. याबाबत पोलिसांनी मिता मलानी या महिलेची चौकशी केली असता राकेश इशरानी यांच्याकडून बनावट नोटा चलनात आणण्यासाठी घेत असल्याची माहिती दिली.
मिता उर्फ हरी मलानी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, गुन्हे अन्वेषण विभागाने राकेश इशराणी याला अटक केली. घराची व राकेश इशरानीची झडती घेतली असता, त्याच्याकडून ३२ हजाराच्या अशा एकूण ४३ हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. महिलेने ५० हजारापेक्षा जास्त बनावट नोटा शहरात चलनात आणल्याची कबुली पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रत्यक्षात कितीतरी लाखाच्या बनावट नोटा चलनात असल्याचं बोलले जात आहे. राकेश इशरानी अल्पशिक्षित असून रिक्षा चालक होता. तर मिता उर्फ हरी मलानी ही महिला अशिक्षित आहे. कर्जावर स्कॅन मशिन खरेदी करून हुबेहुब बनावट नोटा बनवित असल्याचे उघड झाले. तशी कबुली इशराणी यांने पोलिसाकडे दिली. शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेश तरडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक युवराज सालगुडे करीत आहेत.