भिवंडी : राज्यभरात भाेंग्यावरून वातावरण तापले असताना संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भिवंडीत अनेक मशिदींच्या मौलानांनी पहाटेच्या फजरच्या नमाजावेळी अजानच्या भोंग्यांचा आवाज कमी ठेवून सामंजस्याची भूमिका घेतली. शहरात धार्मिक तेढ वाढू नये यासाठी पोलीस प्रशासनाने विविध धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठका घेऊन मन त्यांचे मन वळविण्यात यश मिळवले.
भिवंडी शहरात तब्बल १६० मशिदी आहेत. भिवंडी पोलीस परिमंडळाचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी मशीद विश्वस्त, मौलवी यांच्या बैठका घेऊन त्यांना कायदा राखण्याबाबत सूचना दिल्या हाेत्या. त्यामुळे बुधवारी सकाळी फजरच्या नमाजावेळी बहुसंख्य मशिदींनी अजानच्या भोंग्यांचा आवाज कमी ठेवला हाेता. शहरातील दारुललूम दिनीयाद मदरसा मशिदीचे विश्वस्त मौलाना रइस अहमद नदवी यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत कायद्याचे पालन झाले पाहिजे. स्थानिकांना त्रास होत असेल तर भोंगे बंद केले पाहिजेत. त्यावर राजकारण करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
मशिदींतील लाऊड स्पीकरवर केवळ अजान देत नाहीत. पालिका आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांना उद्घोषणा करण्यासाठी मदत करीत असते. बालकांचे लसीकरण, पोलिओ लसीकरण, लॉकडाऊन काळात घ्यावयाची खबरदारी याबाबत नेहमी मशिदीच्या भोंग्यांवरून नागरिकांसाठी माहिती दिली जाते. भोंग्यांना बंदी घातल्यास त्या कामातही अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी भावना मौलाना रईस अहमद नदवी यांनी व्यक्त केली.
आवाजाबाबत मुस्लिमांच्याच अधिक तक्रारी
आम्ही स्वतः आवाज कमी करण्यासाठी आग्रही असून बऱ्याच वेळा मशिदींमधील आवाजाबाबत हिंदूंपेक्षा मुस्लिम समुदायाकडून अधिक तक्रारी आमच्याकडे येतात, असे हिंदुस्थान मस्जिदचे विश्वस्त मुस्ताक मोमीन यांनी सांगितले.