- पंकज पाटीलबदलापूर : तुम्ही सिलेक्ट केलेला फ्लॅट सुंदर आहे. त्याचे लोकेशन लाखमोलाचे आहे. या रिव्हर फेसिंग फ्लॅटमधून तुम्हाला नेहमीच मस्त व्ह्यू दिसेल. त्यासाठी तुम्हाला प्रीमिअम रेट लागू होऊन चार लाख एक्स्ट्रा भरावे लागतील. मोठ्या हौसेने हा फ्लॅट घेतलेले सध्या डोक्याला हात लावून बसले आहेत. कारण उल्हास नदी कोपली आणि तिने या फ्लॅटला कवेत घेतल्याने घरातील संसाराचा बट्ट्याबोळ झाला आहे.बदलापूरमध्ये उल्हास नदीच्या पूररेषेबाबत निश्चिती नसल्याने अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नदीपात्रालगत इमारती, बंगले उभे केले आहेत. त्याच्या जाहिराती करताना ‘रिव्हरटच’, ‘रिव्हरव्ह्यू’ प्रकल्प अशीच भलामण केली जात आहे. ज्या ग्राहकांना घरातून नदी न्याहाळायची आहे, नदीवरून येणारे वारे अनुभवायचे आहेत, त्यांना मूळ किमतीच्या १० टक्क्यांपर्यंत वाढीव रक्कम घेऊन फ्लॅट विकले गेले. त्यामुळे मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या ३० ते ३५ लाखांच्या फ्लॅटकरिता अतिरिक्त तीन ते चार लाख मोजले.उल्हास नदीच्या पुलाजवळ फ्लॅट विकणाºया एका बड्या बिल्डरने पाच हजार रुपये प्रति चौ.फू. हा दर आकारला. बदलापूर स्टेशनपासून अडीच किमी दूर हा प्रकल्प असतानाही नदीच्या आकर्षणामुळे जास्त दर ग्राहकांनी मोजला. त्याचवेळी नदीच्या विरुद्ध बाजूचे फ्लॅट १० टक्के कमी दराने विकले.हेंद्रेपाडा, बॅरेज डॅम परिसर, वालिवलीत इमारती, बंगले नदीच्या पुरात पाण्याखाली गेल्याने अनेकांची ‘रिव्हरटच’ वास्तव्याची हौस फिटली आहे. कारण, नदी काळनागीण होऊन चक्क वैरिण झाल्याचा कटू अनुभव त्यांनी घेतला.बदलापूर, अंबरनाथ परिसरांत गरजू लोकांनी हौसेने फ्लॅट घेतले आहेत. कारण, आता डोंबिवली-कल्याण हेही मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. याखेरीज, सेकंड होम किंवा वीकेण्ड होम खरेदी करणारा मोठा वर्ग आहे. उल्हास नदीच्या तीरावर बांधलेल्या एका स्कीममध्ये दीड कोटी रुपयांना बंगले खरेदी केले गेले. पुरात ते बंगले पाण्याखाली गेल्याने सेकंड होम खरेदी करणाऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरश: लगदा झाला आहे. फसव्या जाहिरातींना बळी पडल्याची त्यांची भावना आहे.
बदलापूरमध्ये रिव्हर फेसिंगकरिता चार लाख जास्त, रहिवाशांनी मारलाय कपाळावर हात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 1:43 AM