लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठामपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने रुग्णदुपटीचा कालावधी ४०० दिवसांवरून १८३ वर आला आहे. नवीन रुग्णांमध्ये घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सध्या मनपा हद्दीत प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दोन हजार ४८७ असून, त्यापैकी विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या एक हजार ११४, तर घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या एक हजार १५३ एवढी आहे.
फेब्रुवारीअखेरपासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ठामपाने शहरात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनपाने खबरदारीचे उपाय आखण्यास सुरुवात केली आहे. मनपा हद्दीत आतापर्यंत ६५ हजार ५४४ रुग्ण आढळले असून, त्यातील ६१ हजार ७०६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, एक हजार ३५१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, सध्या दोन हजार ४८७ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत.
१ ते १२ मार्चदरम्यान शहरात नवीन दोन हजार ५३८ कोरोना रुग्ण सापडले आहेत. सध्या रोज २०० ते ३०० रुग्ण आढळत आहेत. आजही एखाद्याला कोरोनाची लागण झाली, तर त्याच्या संपर्कातील ४० ते ४२ जणांचा शोध घेतला जात असल्याचा दावा मनपाने केला आहे. दुसरीकडे रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९७ टक्क्यांवरून ९४.१४ टक्क्यांवर घटले आहे. मृत्युदर हा २.०६ टक्के, तर रुग्णवाढीचा दर ५.५९ टक्क्यांवर आला आहे.
१४२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक
- सध्या प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या दोन हजार ४८७ रुग्णांपैकी विविध कोरोना सेंटरमध्ये एक हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, एक हजार १५३ रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपेक्षा घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात जास्त आहे.
- त्यातही काही प्रमाणात लक्षणे असलेले ९६५ रुग्ण आहेत. तर, लक्षणे नसलेल्यांची संख्या एक हजार ३८० एवढी आहे. १४२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील १३५ जण आयसीयू, तर सात जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती मनपाने दिली. त्यामुळे अधिक प्रमाणात न घाबरता नागरिकांना केवळ शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.
---------