स्नेहा पावसकर
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : १९ मार्च २०२० रोजी ठाण्यात पहिले विलगीकरण केंद्र कार्यान्वित करण्याची जबाबदारी दिली ती डॉ. अनिता कापडणे यांच्यावर आणि त्यांनी ती यशस्वीपणे सांभाळली. इतकेच नव्हे, तर ते कार्यान्वित झाल्यावर झोनल ऑफिसर माजिवाडा-मानपाडा प्रभाग व भायंदरपाडा येथील विलगीकरण सुरू करून तेथीलही कार्यभार अशी विविध जबाबदारी महापालिकेने त्यांच्यावर सोपवली. खरंतर तो काळ प्रत्येकाला घाबरवणारा होता. मात्र, त्यांनी स्वत: न घाबरता आणि उलट भयभीत होणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. सकाळी आठ वाजता सुरू होणारे त्यांचे काम रात्री अकरा वाजता संपायचे. रुग्णांची चौकशी करणे, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कात राहणे, अगदी ॲम्ब्युलन्स बोलावणे ही कामेही डॉ. अनिता स्वत: करत होत्या.
या काळात माझ्या कुटुंबातील सर्वांनी केलेले सहकार्य आणि माझी मुलगी कजरी हिने घराची जबाबदारी घेतल्यामुळे मला या कोरोना रुग्णांची देखभाल ठेवता आली. हा कोरोनाचा काळ सगळ्यांसाठीच नवीन होता. मात्र, याच काळात मी खूप काही शिकले. सामान्यातील सामान्य व्यक्तींना मदत करता आली याचे समाधान अधिक आहे, असे डॉ. अनिता सांगतात. सध्या त्या महापालिका मुख्यालय जन्म-मृत्यू विभागात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तथा उपनिबंधक या पदावर कार्यरत आहेत.
-------------
----------------
त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी ‘ती’चे प्रयत्न
सामान्य कुटुंबातील महिलांसाठी मोफत ब्युटीपार्लरचे कोर्स गेली अनेक वर्षे कलर्स इन लाइफ फाउंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष साक्षी बैरागी या चालवितात. मात्र, या कोरोनामुळे गेल्या वर्षी सर्वच दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. कोरोनाकाळात आधीच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशातच महिलांना घरच्या घरी बसून पोटापाण्यासाठी एखादा व्यवसाय करता यावा या उद्देशाने त्यांनी या दरम्यानही ऑनलाईन कोर्स घेतले. काही प्रमाणात ऑनलाईन कोर्स यशस्वी झाले; मात्र त्यानंतर त्यांनी व्हिडिओद्वारे महिलांना मार्गदर्शन केले. तर आता अनलॉक झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी महिलांसाठी मोफत कोर्स सुरू करून त्यांच्या हाताला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.