मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील जवळपास २४ हुन अधिक विहिरींची टप्या टप्याने साफ सफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जिवंत करण्यासाठी एकूण ५० कोटी रुपये निधी मंजूर केला असून महापालिकेतर्फे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगत त्या कामांची सुरवात आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.
मीरा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा अपुरा त्यातच अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे बंद राहतो . एप्रिल-मे महिन्यात पाणी कपातीला नागरिकांना तोंड द्यावे लागते. नागरिकांना पाणी टंचाई व बाहेरून पाणी विकत घेण्याचा भुर्दंड पडतो . त्यामुळे शहरात पूर्वीच्या काळापासून असलेल्या विहिरी पुर्नजीवित कराव्यात, या विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जपले जावेत, भविष्याच्या दृष्टीने हे पाणी नागरिकांच्या उपयोगी पडण्यासाठी सर्व विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफ सफाई करण्याची मागणी आ . सरनाईक यांनी चालवली होती.
अनेक पूर्वीच्या विहिरी बुजवल्या गेल्या आहेत. काही विहिरी १०० वर्ष जुन्या आहेत. काही ठिकाणी कचराकुंडी म्हणून विहिरीचा वापर होतोय. तर काही विहिरींमध्ये चक्क सांडपाणी सोडून विहिरी प्रदूषित केल्या गेल्या आहेत. अशा बहुतांश सगळ्या विहिरी घाण होऊन पाण्याला दुर्गंधी येते. तसेच आतील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद होत चालले आहेत. अश्या विहरींची साफसफाई करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे . ७ मार्च रोजी मीरा गावठाण, महाविष्णू मंदिराशेजारील विहीर व मस्कर पाडा, काशीमीरा येथील या दोन विहिरींच्या कामाची सुरवात आ. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली .
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, जिल्हासंघटक निशा नार्वेकर, १४६ ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रप्रमुख सचिन मांजरेकर, मिरा भाईंदर १४५ विधानसभा क्षेत्रप्रमुख विक्रम प्रताप सिंह, महिला संघटक’’ पूजा आमगावकर, उपजिल्हाप्रमुख विकास पाटील, , रामभवन शर्मा, युवासेना ठाणे पालघर निरीक्षक स्वराज पाटील, माजी नगरसेविका संध्या पाटील, वंदना पाटील, उपशहरप्रमुख ऍड बाबासाहेब बंडे, कमलाकर पाटील, राजु पाटील, शिवाजी पानमंद, उपशहरसंघटक गिता रॉय, शहरसमन्वय संगिता खुणे आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
सर्वच विहिरींची टप्या टप्याने साफ सफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जिवंत करण्यासाठी एकूण ५० कोटी रुपये निधीची आवश्यकता असल्याने त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. विहिरींच्या संवर्धन प्रकल्पात खोदाई करून साफसफाई व त्यातील पाण्याचे झरे जिवंत केले जातील. सांडपाणी सोडले जात असेल तर ते बंद केले जाईल. विहिरीचे कठडे नव्याने बांधून, प्लास्टरिंग करणे व सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रील लावण्यात येणार आहे. विहिरींच्या वर जलशुद्धीकरण सयंत्र लावण्यात येणार आहे. हे यंत्र पूर्णतः सौर उर्जेवर चालणारे असेल. इनलेट पॅरामीटर्स वर आधारीत वॉटर ट्रीटमेंट प्लांटची रचना करण्यात येणार आहे. या यंत्रणेत वाळू गाळण्याची प्रक्रिया कार्बन फिल्टरेशन, अल्ट्रा फिल्टरेशन, यु.व्ही. प्रणालीचा समावेश केला आहे जेणेकरून विभागातील नागरिकांना दैनंदिन वापराकरिता योग्य व शुद्ध असे पाणी उपलब्ध होणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.